योग्य आहार, औषधोपचारानंतर तिव्र कुपोषीत बालके “सुधारतात”

445 मुलांच्या वजनामध्ये वाढ : 108 जण मध्यम कुपोषीत गटांत

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 10 – एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत जिल्हा परिषदेमार्फत चालविण्यात येणाऱ्या अंगणवाड्यांमध्ये दिला जाणारा पोषण आहार व योग्य औषधोपचारामुळे कुपोषीत मुले सुदृढ होवू लागली आहेत. 26 जून रोजी जिल्ह्यातील 3 लाख 15 हजार बालकांचे त्यांच्या पालकांसमोर वजन व उंची मोजण्यात आली होती. यामध्ये 612 तिव्र कुपोषीत बालके आढळून आली. मात्र, यापैकी 445 बालकांच्या वजनामध्ये आता वाढ होत असून, तिव्र कुपोषीत 108 बालके मध्यम कुपोषीत गटांत आली आहेत.

महिला व बालकल्याण विभागामाच्या वतीने जिल्ह्यात 4 हजार 605 अंगणवाड्या चालविल्या जातात. यामध्ये शुन्य ते सहा वयोगटातील 3 लाख 15 हजार बालके पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवतात. या बालकांचे आरोग्य कसे आहे, वयाच्या मानाने त्यांचे वजन व उंची योग्य प्रमाणात आहे का? हे पाहण्यासाठी वजन व उंचीचे मोजमाप करण्यात आले. तब्बल 8 हजार 531 अंगणाडी सेविका आणि मदतनिसांच्या माध्यमातून हे काम करण्यात आले. दरम्यान, बालकांच्या घेतलेल्या वजनाचा अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला. त्यामध्ये 612 बालके तिव्र कुपोषीत असल्याचे स्पष्ट झाले होते, असे विभागाच्या सभापती राणी शेळके आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी सांगितले.

कुपोषीत बालकांना दोन महिने अंगणवाडी सेविका आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्‍टर यांच्या देखरेखीखाली अतिरिक्त पोषक आहार, औषधोपचार दिला जात आहे. आहारामध्ये अंडी, केळी, उकडलेला बटाटा, मोड आलेले कडधान्य, शिरा, उपीट यासह पौष्टीक अन्नपदार्थ देण्यात येत आहेत. अंगणवाडीमध्ये बालकांसाठी बाळ कोपरा तयार करण्यात आला असून त्या कोपऱ्यात शेंगदाणा लाडू, चिक्की असे पदार्थ ठेवले जात आहेत. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्‍टरांकडून आवश्‍यक ती औषधी देण्यात येत आहेत. या मुलांचे दर आठवड्याला वजन करून, त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत असल्याचेही चाटे यांनी सांगितले.

————————-
मागील महिन्याभरात तीव्र कुपोषीत असलेल्या जिल्ह्यातील 612 बालकांपैकी 445 बालकांच्या वजनामध्ये वाढ झाली आहे. त्यामध्ये दौंड तालुक्‍यातील 90 मुलांच्या वजनामध्ये वाढ झाली आहे. त्यापाठोपाठ जुन्नरमधील 64, हवेली 63, बारामती 48, मावळ 40, इंदापूर 38, खेड 35, आंबेगाव 34, पुरंदर 15, मुळशी 8, भोर आणि शिरुर प्रत्येकी 5 अशा एकूण 445 बालकांच्या वजनात वाढ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)