जामखेड : योगेश व राकेशला न्याय द्या, ग्रामीण रुग्णालयातील सर्व डॉक्टरांसहित सर्व कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करा व गुन्हेगारांची तालीम तात्काळ पाडा या मागणीसाठी जामखेड मधील संतप्त महिलांनी आज जामखेड पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, नगरपरिषदेवर निषेध मोर्चा काढून तीव्र संताप व्यक्त केला. सकाळी १०.३० च्या संतप्त महिलांनी मोठ्या संख्येने निषेध मोर्चा काढून पोलीस स्टेशनला घेराव घालून योगेश राळेभात व राकेश राळेभात याना न्याय मिळालाच पाहिजे , गुन्हेगारांची तालीम बंद करा ,अशा घोषणा देत हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. शनिवारी (दि. २८) सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या वाजण्याच्या सुमारास राळेभात बंधुवर गुंडांनी गोळीबार करून ठार मारले. यामधील आरोपींना अटक करावे तसेच तालमीच्या नावाखाली गुंड पोसण्याचे काम माने कुटुंब करीत आहेत. त्यांना याप्रकरणी सहआरोपी करावे, अशी मागणी करीत जामखेडमधील महिलांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. शहरातील कायदा व सुव्यवस्था पुर्णपणे ढासळली असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सक्षम व कायमस्वरूपी अधिकारी तात्काळ देण्यात यावा. अशी मागणी महिलांनी केली.
यानंतर संतप्त महिलांनी आपला मोर्चा पोलीस स्टेशनकडून ग्रामीण रुग्णालयाकडे वळवला. गोळीबार झाल्यानंतर जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने जास्त वेळ गेला व यात दोन तरुणांचा जीव गेला. कामात हलगर्जीपणा करणार्या डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावे, जोपर्यंत दवाखान्यात चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत तोपर्यंत आम्ही दवाखाना उघडू देणार नाही, असे म्हणून ग्रामीण रुग्णालयाला कुलुप ठोकले. यावेळी संतप्त महिलांनी पालकमंत्री राम शिंदे यांच्या विरोधात घोषणा देऊन ग्रामीण रुग्णालयाच्या समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असूनही त्यांनी कधी लक्ष दिले नाही. त्यांनी तात्काळ सर्व डॉक्टरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली. यावेळी रुग्णालयात उपस्थित असणारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी ‘आरोपी मोकाट फिरत असूनही पोलीस त्यांना का अटक करत नाही ,जामखेड मध्ये गुंडानी थैमान घातले असतानाही पोलीस मूग गिळून गप्प का आहे?’ असा सवाल महिलांनी केला.
त्यानंतर संतप्त महिलांनी आपला मोर्चा नगरपरिषद कार्यालयाकडे वळवला. नगरपरिषदेसमोर महिलांनी गुन्हेगारांची तालीम बंद करा ,योगेश, राकेश ला न्याय द्या अशा घोषणा करून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्याशी फोन वरून स्थायी समितीची तटाकल बैठक घेऊन तालीम पडून टाका अशी मागणी केली. आज सुट्टी असल्याने २-३ कर्मचारी नगरपरिषदेमध्ये उपस्थित होते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा