“योगा, योगी आणि योग’

 

परप्रांतातून बाबा मराठी प्रदेशात “कृष्णकुंज’वर पोहोचले. परप्रांतीय गाडी मराठी टोल नाक्‍यावर थांबलीआणि अनेकांच्या भुवया उंचावल्या.परंतु बंद दाराआड चर्चा झाली अन सारे हिरमुसले; सर्वांचाच हिरेमोड झाला. मात्र आम्हीही “रॅन्समवेअर व्हायरस’ प्रमाणे कुठेही व कुणाच्याही परवानगीशिवाय कुठेही घुसण्याच्या अमर्याद क्षमतेचे धनी असल्याने, मायबाप वाचकांसाठी सविस्तर वृतांत आणलाच. कृपया वाचकांनी विश्वास ठेवावा, सन 2014 मध्ये “अच्छे दिन’च्या आश्वासनावर ठेवला अगदी तसाच…
बाबा “कृष्णकुंज’मध्ये प्रवेश करतात, राजसाहेबही आतून येतात, अधूनमधून नाक खाजवणे सुरूच, दोघेही एकमेकांना बघून आयुर्वेदीक हसतात, कुठलाही साईड इफेक्‍ट नसलेले हास्य.
“स्वागत आहे स्वामीजी. आम्ही धन्य झालो, आमच्या राजवाड्यात चक्क सुदामा अवतरले.’
“हा हा हा! राज जी, तुमचा हाच ऍटीट्युड आम्हाला भावतो, आम्हालाच काय अख्ख्या हिंदुस्तानला भावतो.’
“योगा घेउन एक योगी आम्हाला भेटायला येण्याचा हा योग ही दुर्मिळच स्वामी ‘.
“राज जी, तुम्ही शब्दांचे धनी आहात. तुमच्या वक्तृत्वासमोर आम्ही पामर कसे टिकणार?’
“बोला स्वामी जी? काय सेवा करू?’
“राज जी! योग करण्यासाठी शरीर लवचिक असावे लागते, तसेच राजकारण करण्यासाठीही लवचिक रहावे लागते. हा हा हा’.
“मोकळेपणाने बोला स्वामी. आपण दोघेच आहोत इथे.’
“जरूर! राज जी, आम्हाला आमचे नुडल्स लॉंच करावयाचे होते बाजारात, गळेकापू स्पर्धा होती, आम्ही नेसलेच्या मॅगीचा अपप्रचार सुरू केला, शासनाने काही काळ बंदी घातली, आम्ही संधीचे सोने केले अन आज पतंजली नुडल्स हा एक मोठा ब्रॅंड झाला आहे’.
“स्वामी जी, आम्हाला का सांगताय हे?’
“तुमची अवस्था आज लॉंच न झालेल्या नुडल्स सारखीच आहे. बाजारात डिमांड आहे “मॅगी’ म्हणजे तुमच्या बंधूंना, त्यांना साईड ट्रॅक केल्यावरच तुमचे रिलॉंचींग शक्‍य आहे आता’.
“म्हणजे लालूंना अडचणीत आणून नितीशकुमारना जवळ आणण्याची खेळी बिहारमध्ये सुरू आहे तशी?’
“तुमचे राजकीय निरिक्षण अफलातून आहे, राजसाहेब, व्वा!’
“धन्यवाद स्वामी जी, पण आम्ही काय प्रॉडक्‍ट आहोत काय बाजारात लॉंच करायला? हॅ!!’
“आपण सारेच प्रॉडक्‍ट आहोत राजे; आणि आपले नाणे बाजारात चालावे असे वाटण्यात गैर ते काय?’
“…हूँ …!’
“संधी चालून आली आहे, आम्हाला “मॅगी’ हटवायची आहे बाजारातून. का ते तुम्हाला ठावूक आहे.’ .
“अर्थातच…’ ! स्वामी जी, हा राजकीय योगी पण छान जमतो हं तुम्हाला. कुणाला शीर्षासन करायला लावायचे, कुणाला पवनमुक्तासन हे जाणता तुम्ही. हा हा हा!’
“ऋषी मुनींचा आशीर्वाद आहे राज जी.’
“ऋषी मुनी? पुराण कालीन? की आपण नियुक्त केलेले राष्ट्रऋषी? हा हा हा!’
“राज जी! आप भी खुब मजाक कर लेते हो. हा हा हा!’
दोघेही आयुर्वेदीक हास्यात बुडाले आणि आम्ही काढता पाय घेतला.

धनंजय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)