ये रे ये रे पावसा…

File Photo

मे महिन्याची सुट्टी संपून, जून महिना उजाडला की मामाच्या गावाकडचा मुक्‍काम आवरता घ्यावा लागत असे. पुन्हा सुरू होणाऱ्या शाळेचे वेध लागत असत. सुट्टीमध्ये मामीच्या हातची शिकरण पोळी, आजी आजोबांचे लाड, मामाने सांगितलेल्या भुताच्या गोष्टी, गच्चीवर चांदण्यात झोपताना बहीण भावंडाचे चाललेले हितगुज, आजोळी आलेल्या मावस, मामे भावंडांशी झालेली लुटूपुटूची भांडणे, मावशीने केलेले लाड, रंगलेले पत्त्यांचे डाव, अंगणात रबरी बॉलचे रंगलेले क्रिकेटचे सामने, कॅरम, बुद्धिबळ किंवा पट खेळताना केलेली मजा, एक दिवस झालेली भेळ आणि आइस्क्रीम पार्टी या साऱ्याच्या गोड आठवणी मनात साठवत आम्ही पुण्याला येणारी एस.टी. पकडत असू.

जून महिन्याच्या सुरुवातीलाच पाऊस पडण्याची सुरुवात होत असे. आमच्या लहानपणी पुण्यात खूप उकडत असलेले काही आठवत नाही. एखादी वळवाची सर मे महिन्याचा उकाडा सुसह्य करत असे. शाळा सुरू होण्यापूर्वीच पहिला पाऊस सुरू झाला की, अंगणात मुले “ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा’ हे गाणं म्हणत नाचत असत. या पावसाचा आणि पैशाचा काहीही संबंध नाही, तो पैसा खोटा आहे म्हणूनही पाऊस मोठा पडत नाही. पण हेच गाणं वर्षानुवर्षे मुले म्हणत असतात.

या पावसाचं आणि साऱ्या सृष्टीचं हे नातं असं अतूट आहे. पावसाशिवाय जशी सृष्टी नाही तसं मानवी जीवनही नाही. म्हणूनच मानव पावसाची विनंती करतो, त्याला आळवतो आणि म्हणतो ये रे ये रे पावसा…

यावर्षी तर उकाड्याचा उच्चांक झाला आहे. सगळीकडे रखरखाट जाणवतो आहे. दुपारच्या वेळात डांबरी रस्ते तप्त होत आहेत. वाऱ्याचा मागमूसही नाही. वळवाची सर नाही. इमारतींच्या डोलाऱ्यामुळे झाडे कमी झालेली. विसाव्यासाठी झाडाखाली थांबायची सोय नाही, वाहनांची गर्दी आणि आवाज यांनी होणारे प्रदूषण, त्यामुळे हवेत आलेला कोरडेपणा. यामुळे यावर्षी सर्वांनाच उन्हाळा असह्य झाला आहे.

सकाळी अगदी 9 वाजता देखील उन्हाचा चटका जाणवत आहे. घरात पंखे अखंड फिरत आहेत. रात्री किंवा अगदी दुपारी सुद्धा ए. सी. चालू आहेत. अनेक गावांतून पाण्याची टंचाई आहे. नद्या, विहिरी, तळी आटली आहेत. पाण्यासाठी काही ठिकाणी लोकांना वणवण फिरावे लागत आहे. ज्येष्ठ लोकांना घराबाहेर पडणे मुश्‍कील झाले आहे आणि घरात बसणेही. तरुणांना देखील अखंड उन्हात फिरताना काळजी घ्यावी लागते. हेल्मेट, स्कार्फ, मोजे, गॉगल्स याशिवाय गाडीवर जाताना उन्हाचे चटके बसत आहेत.

यापुढेही असाच उन्हाळा राहिला तर पुढील काही वर्षात इथे राहणेही मुश्‍कील होईल. या वर्षीच्या त्रासापेक्षा पुढची चिंता विनवणी करून म्हणते, खरंच…
ये रे ये रे पावसा…
ये रे ये रे पावसा…

– आरती मोने

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)