येवलेवाडी डीपीच्या रिंगणात आता काकडेही

प्रशासनाचा डीपी मंजूर करण्याची मागणी : कोणताही आमदार म्हणजे पक्ष नाही

पुणे – आरोप प्रत्यारोपामुळे गाजत असलेल्या येवलेवाडीच्या विकास आराखड्याच्या रिंगणातील धुरळा खाली बसत असतानाच; भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनीही उडी घेतली आहे. या आराखड्यात केलेले बदल हे नागरिकांसाठी अन्यायकारक असून प्रशासनाने केलेला डीपीच मान्य करावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे काकडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कोणताही आमदार, पदाधिकारी म्हणजे पक्ष नाही असे सांगत, आमदार टिळेकर यांचे नाव न घेता या बदलांवर टिका केली.

काकडे म्हणाले, येवलेवाडीबाबत आपल्याकडे काही नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. त्यांच्यावर अन्याय होत असल्याने या प्रश्‍नी मी स्वत: मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही बाब घालणार आहे. त्यासाठी आपण महापालिकेस पत्र पाठवून प्रशासनाने तयार केलेला आराखडा, त्यामधील आरक्षणे, त्यानंतर शहर सुधारणा समिती, नियोजन समिती आणि मुख्य सभेने आराखड्यात केलेले बदल याची माहिती नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याकडे मागितली आहे. ही माहिती येत्या चार ते पाच दिवसांत माझ्या हाती येईल. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगणार असल्याचे काकडे म्हणाले. तसेच, या आरोपांबाबत अद्याप शहराध्यक्ष, पालकमंत्री चुप्पी साधून असल्याचे सांगताच; पुणेकरांनी बहुमत विश्‍वासाने दिले आहे. भाजपच्या नगरसेवकांनी चांगले काम करावे, अशी पुणेकरांची अपेक्षा आहे. कोणताही आमदार, नगरसेवक तसेच पदाधिकारी म्हणजे पक्ष नाही, यात ज्यांनी चुका केल्या यावर काही बोलायचे नाही असे सांगत, प्रत्यक्षपणे टिळेकर यांचे नाव न घेता निशाना साधला.

नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्‍यता
पालकमंत्री गिरिश बापट यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर दाखल केलेला आब्रुनुकसानीचा दावा, बापट यांनी आपल्या तक्रारीत तथ्थ नसल्यानेच मागे घेतला असल्याची उपरोधीक टिका भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केली आहे. काकडे म्हणाले, मलिक यांच्या आरोपानंतर बापट यांनी वकीलांच्या सल्ल्यानुसार, दावा दाखल केला असेल, मात्र न्यायालयात हा दावा आपल्या बाजूने लागणार नाही असे दिसताच, त्याच वकिलांच्या सल्ल्याने बापट यांनी दावा मागे घेतला असेल. जर, बापट त्यानंतर मलिक यांनी सरकारवर टिका केली असे वक्तव्य करत असतील तर, सरकारचे प्रतिनिधी म्हणून तसेच ज्या तूरडाळीवरून आरोप झाले त्या, मंत्रालयाचे मंत्री म्हणून ही जबाबदारी बापट यांचीच असल्याचेही काकडे म्हणाले. त्यामुळे एका बाजूला बापट, मलिक वादावर पडदा पडला असतानाच; दुसऱ्या बाजूला काकडे यांच्या या टिकेमुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)