येवलेवाडीच्या शाळा हस्तांतराची प्रक्रिया कागदावरच

 

पुणे,  (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेने येवलेवाडीतील प्राथमिक शाळा पालिकेकडे हस्तांतरणाचा निर्णय तीन वर्षांपुर्वी घेतला होता. मात्र, महापालिकेने येवलेवाडीतील प्राथमिक शाळेच्या इमारतीचा मोबदला जिल्हा परिषदेला देण्यास नकार दिला आहे. यामुळे येवलेवाडीतील शिक्षक आणि शाळा हस्तांतरणाची प्रक्रिया कागदावरच राहिली आहे.
महापालिकेच्या हद्दीमध्ये येवलेवाडीचा समावेश झाल्यानंतर महापालिकेकडे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळेची इमारत आणि 22 शिक्षकांचे हस्तांतर करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमध्ये झाला होता. येवलेवाडीच्या शाळेची इमारत आणि शिक्षकांचे पालिकेकडे वर्ग करून त्याऐवजी इमारतीचे व जागेचे मूल्यांकन पालिकेने जिल्हा परिषदला द्यावे किंवा पालिकेच्या हद्दीतील बंद शाळा इमारत जिल्हा परिषदेच्या कार्यालयीन वापरासाठी कायमस्वरुपी देण्यात यावी अशी अट या ठरावामध्ये होती.
या ठरावानुसार जिल्हा परिषदेने शाळा हस्तांतरणासाठी पालिकेशी पत्रव्यवहार केला. या संदर्भात ग्रामविकास विभाग आणि शिक्षण विभागाकडे देखील मान्यतेसाठी जिल्हा परिषदेने पत्रव्यवहार केला होता. परंतु, महापालिकेने शाळा हस्तांतरणास नकार दिला. यामुळे येवलेवाडी पालिकेत आणि शाळा जिल्हा परिषदेमध्ये अशी स्थिती आहे.
……………
जिल्हा परिषदेने येवलेवाडीच्या शाळा पालिकेमध्ये हस्तांतर करावी. या शाळेच्या इमारतीची किंमत अथवा तेवढ्या किमतीची इमारत जिल्हा परिषदेला द्यावी, असा ठराव केला होता. मात्र, पालिका शाळेचा मोबदला देण्यास तयार नाही. यामुळे येवलेवाडीतील शाळेचे हस्तांतरणाचे काम रखडलेले आहे. – डॉ. मुश्‍ताक शेख, शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)