येळसेत गुलालाची उधळण, बाप्पांचे विसर्जन

येळसे – गुलालाची उधळण करत ढोलताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात बाप्पांना निरोप देण्यात आला.

शुक्रवारी लाडक्‍या गणरायांचे घरा-घरात आगमन झाले होते. गणेशोत्सवात प्रत्येक कुटुंबात आनंदाला उधाण येते आणि गणपती बाप्पांचे सान्निध्य सर्वांना हवेहवेसे वाटते. सात दिवस बाप्पा कुटुंबातील एक सदस्यच बनून जातात. विशेषत: लहान मुलांचे लाडके असे बाप्पा मुलांना कायमस्वरुपी घरात हवे असतात. परंतु परंपरेनुसार विसर्जन करावे लागते, हे सात दिवस हि सर्वांना कमी वाटतात. अखेर बाप्पांना निरोप देण्याचा दिवस उजाडला आणि जड अंत:करणाने बाप्पांना हाती घेऊन नामघोषाच्या गजरात कुटुंबातील सर्व सदस्यांनी घाटाची वाट धरली.

शुक्रवारी गणरायांची प्रतिष्ठापणा करण्यात आली होती. या सात दिवसांमध्ये खीर, मोदकासह पुरणपोळी व अन्य स्वादिष्ट पक्‍वानांचा नैवैद्य दाखवण्यात आला. गेले सात दिवस गणरायाची मनोभावे पूजा-अर्चना करण्यात आली. पाहुणे आप्तेष्टांना घरी बोलावून गणेशउत्सवाच्या शुभेच्छा तसेच सुवासिनींचे हळदी कुंकू आदी कौंटुंबिक सोहळे बाप्पांच्या उत्सवानिमित्त पार पडले. अखेर या आनंदोत्सवाची सांगता गणरायाला निरोप देऊन करण्यात आली. गावातील सर्व गणपती एकत्र येऊन ढोल-ताशांच्या गजरात नदीपात्रापर्यंत नेण्यात आले. नदी पात्रावर पूजाअर्चना करुन लाडक्‍या बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. आपल्या लाडक्‍या बाप्पाला निरोप देताना काही गणेश भक्तांचे डोळे पाणवले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)