येरे.. येरे.. पावसा.. शेतकऱ्यांची आर्त हाक

संगमनेर : तालुक्‍यातील वरवंडी परिसरातील बाजरीच्या पिकांनी माना टाकल्या. (छाया : नितीन शेळके)

संगमनेर तालुक्‍यातील 42 हजार 558 हेक्‍टरवरील खरीप संकटात : उडदाला माव्याचा विळखा

संगमनेर – जुलै महिना उलटून ऑगस्ट महिना आला तरीही संगमनेर तालुक्‍यात अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याने खरीप पिके धोक्‍यात आली आहेत. येत्या आठवड्यात पावसाने हजेरी न घेतल्यास खरीप पिकांचे मोठे नुकसान होण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने येरे.. येरे.. पावसा..’, अशी आर्त हाक शेतकऱ्यांकडून दिली जात आहे.

-Ads-

यंदा सुरवातीला वळवाचा पाऊस झाला. नंतर मोसमी पावसाचे उशिरा आगमन झाले. जेमतेम पावसाच्या ओलीवर उशिराने तालुक्‍यातील खरिपाची सरासरी 69 हजार 200 हेक्‍टर क्षेत्रापैकी 42 हजार 558 क्षेत्रावर 61 टक्के पेरणी झाली. त्यात यावेळी बाजरी पिकाच्या सरासरी 54 हजार 800 पैकी अवघ्या 20 हजार 417 हेक्‍टरवर म्हणजेच निम्याला निम्म्याने पेरणी कमी झाली आहे. याउलट मकाचे सरासरी 1 हजार 300 हेक्‍टर क्षेत्र असतानाही यावर्षी तालुक्‍यात मकाच्या 4 हजार 769 हेक्‍टरवर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहे. गत 30 दिवसांपासून तालुक्‍यात पाउसच गायब झाल्याने खरीप पिके धोक्‍यात आली आहेत.

बाजरी, तूर, उडीद, सोयाबीन, मूग, मटकी यासारख्या हलक्‍या व कमी ताकदीच्या पिकांना सध्या पाण्याची अत्यंत गरज निर्माण झाली आहे. पाउसच नसल्याने या पिकांमधील ताकद कमी होत पिकांत रोगांचा प्रादूर्भाव होत आहे. उडीद पिकावर तर संपूर्ण मावा रोगाचा विळखा पडला. त्यामुळे या रोगाचा नायनाट करण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे.

मध्यंतरी एक दिवस पडलेल्या भीज पावसाने खरीप पिकांना संजीवनी मिळाली होती. या पावसानंतर पिकांत तणांची मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी खुरपणी व कोळपणी करून पिकांमधील तणांचा बंदोबस्त केला आहे. मोठ्या शेतकऱ्यांनी बैलांच्या सहाय्याने कोळपणी करून तणांचा बंदोबस्त केला आहे, तर अल्पभूधारक शेतकऱ्यांनी महिला मजूर खुरपणीसाठी लावून एकरी पाच हजार रुपयांचा खर्च केला आहे.

बियाणे, खतांची खरेदी व पेरणीचा खर्च केल्यानंतर शेतकऱ्यांनी तणांचा बंदोबस्त करण्यासाठी मोठा खर्च केला आहे. इतका खर्च केल्यानंतरही पिकांत पावसाअभावी जीव नसल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला पडला आहे. येत्या आठवड्यात पाऊस पडला नाही तर पिकांची वाढ रोखून उत्पादनात मोठे नुकसान होण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पावसाकरिता ग्रामीण भागातील सर्वच गावातील शेतकरी ग्रामदैवतांना साकडे घालत आहेत.

साकुर परिसरात बाजरीची वाढ खुंटली..

पठार भागातील साकुर परिसरातील दक्षिण भाग वगळता उर्वरित रणखांब, वरवंडी, खांबा, दरेवाडी, पिंपळगाव देपा, बिरेवाडी, खंडेरायवाडी कौठे मलकापूर, हिवरगाव पठार या भागातील बहुतांश बाजरीच्या पिकांनी पावसाअभावी माना टाकल्या आहेत. हा सगळापट्टा खरिपाच्या बाजरीच्या उत्पन्नासाठी आघाडीवर असतो. यावर्षी पावसाने उघडीप दिल्याने बाजरीचे पिक जगेल, असा भारोसाही शेतकऱ्यांना वाटत नाही.

आतापर्यंत सरासरीच्या निम्म्यापेक्षाही कमी पाऊस..

संगमनेर तालुक्‍यात एकूण 466 मि.मी. इतका पाऊस अपेक्षित असतो. मागील वर्षी एकूण 522 मि. मी. इतका पाऊस झाला होता. यंदाच्या वर्षी जून व जुलै या दोन महिन्यांच्या काळात सरासरी या कालावधीत केवळ 243 मि.मी.च पाऊस पडला गेला आहे. यंदा सरासरीच्या निम्म्याच सरी कोसळल्याचे चित्र आकडेवारीवरून दिसून येत आहे. खरीप पिकांच्या वाढीची हीच अवस्था असून येत्या आठवड्यात पाऊस न पडल्यास खरीप पिके कायमची खाली माना घालणार आहेत, हे मात्र निश्‍चित.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)