शाळेच्या आवारातील खड्डयात पडून दोन बालकांचा मृत्यू

पुणे- येरवडा, लक्ष्मीनगर भागातील महापालिकेच्या शाळेच्या आवारात बांधकामासाठी खोदलेल्या खड्डयातील पाण्यात पडून दोन सहा वर्षीय बालकांचा मृत्यू झाला. ही घटना दुपारी घडली. मात्र, सायंकाळी हा प्रकार तेथे खेळणाऱ्या मुलांच्या निदर्शनास आला.

रुद्र भुजबळ (वय 6) आणि रुद्र चव्हाण (वय 6, दोघे रा. लक्ष्मीनगर, येरवडा), अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात पुणे महापालिकेची मातोश्री शाळा आहे. रविवारी दुपारी रुद्र भुजबळ आणि रुद्र चव्हाण शाळेच्या आवारात खेळत होते. शाळेच्या आवारात बांधकामासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. या खड्डयाची खोली सहा फूट असून त्यात पाणी साचले आहे. खड्डयाजवळ खेळणारे दोघेजण दुपारी चारच्या सुमारास तोल जाऊन पाण्यात पडले. दरम्यान, दोघेजण शाळेत नसल्याचे उघडकीस आल्यानंतर कुटुंबीय आणि रहिवाशांनी या मुलांचा शोध सुरू केला.

सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खड्डयात साचलेल्या पाण्यात एक मुलगा पडल्याचे तेथे खेळणाऱ्या मुलांच्या निदर्शनास आले. त्यांनी या घटनेची माहिती रहिवाशांना दिली. तातडीने या घटनेची माहिती काही अंतरावर असलेल्या लक्ष्मीनगर पोलीस चौकीत कळविण्यात आली. येरवडा पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. अग्निशमन दलास ही माहिती कळविण्यात आली. खड्डयात साचलेल्या पाण्यातून दोघांना बाहेर काढण्यात आले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

दरम्यान, याप्रकरणी रात्री उशीरा येरवडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली. याप्रकरणाची चौकशी सुरू असून बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)