येरवडा पोलिसाला मनोरूग्णाकडून धक्‍काबुक्‍की

येरवडा – रस्त्यावर मारहाण करणाऱ्या मनोरूग्णाने पोलिस स्टेशनमध्ये आणल्यावर दोघा पोलिसांना धक्‍काबुक्‍की करीत गोंधळ घातला. विक्षीप्त झालेल्या या मनोरूग्णाला सुमारे अर्धा तासाने शांत करून त्याची रवानगी पोलिसांनी येरवडा प्रादेशिक मनोरूग्णालयात करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी दुपारी औरंगाबाद येथील एका मनोरुग्णाला मनोरूग्णालयात दाखल करण्यासाठी त्याची आई व भाऊ आले होते. त्याच्याकडे आवश्‍यक कागदपत्रांच्याअभावी त्याला दाखल न करता पाठविण्यात आले.

येरवडा पोस्टाजवळ एका वाहनचालकाबरोबर वादविवाद झाल्यामुळे त्या मनोरूग्णाला येरवडा पोलीस स्टेशनला आणण्यात आले. त्याच्याकडे चौकशी करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने शिवीगाळ करून धक्‍काबुक्‍की केली. त्याला आवरता आवरता पोलिसांना नाकीनऊ आले. थोडा शांत झाल्यावर त्याच्याकडून माहिती घेत असताना माहिती घेणाऱ्या पोलिसाला त्याने जोरदार धडक मारली. अत्यंत विक्षीप्त अवस्थेत त्याने पोलिस स्टेशनमध्ये गोंधळ करण्यास सुरुवात केली. पोलीस निरीक्षक मुकुंद महाजन यांनी तात्काळ येरवडा मनोरूग्णालय अधीक्षकांशी संपर्क साधून रुग्णाला दाखल करण्याची विनंती केली. तसेच या रूग्णाला पोलिसांना सुरक्षितपणे मनोरूग्णालयात दाखल करण्याच्या सूचना दिल्या. पोलीस उपनिरीक्षक अनिल लोहार यांनी आवश्‍यक बाबींची पूर्तता करून रूग्णाला दाखल केले.

कागदपत्रांअभावी मनोरूग्णालयाने परत पाठविलेल्या रूग्णाने पोलिस स्टेशनमध्ये धिंगाणा घातल्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. पोलीस कर्मचाऱ्यांना त्याला आवरणे कठीण झाले होते. या गंभीर घटनेत कदाचित एखादा अनुचित प्रकार घडला असता. मात्र, पोलिसांनी त्याला कायदेशीर बाबींची पूर्तता करून रुग्णालयात दाखल केले. मनोरूग्णालय प्रशासनाने अशा गंभीर घटनांच्या बाबतीने तातडीने उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)