येरवडा खूनप्रकरणी दोघांना अटक

पुणे/येरवडा – येरवड्यातील कॉमर्स मैदानात मंगळवारी रात्री नितीन कडाळे (25 रा. पंचशीलनगर येरवडा) याचा दगडाने ठेचून खून झाला होता. या प्रकरणी तपास करून येरवडा पोलिसांनी गुरुवारी दोघांना अटक केली. अजिंक्‍य विजय कांबळे (22, रा.पंचशील नगर, येरवडा) व एका विधीसंघर्ष बालकास अटक करण्यात आली आहे.

किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दोघांनी मिळून निखीलचा डोक्‍यात दगड घालून खून केला होता. येरवडा पोलिसांनी या गंभीर गुन्ह्यातील दोघा आरोपींना चोवीस तासांच्या आत जेरबंद केले. येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजिंक्‍य व त्याचा दुसरा मित्र हे निखीलचे मित्र आहेत. मंगळवारी रात्री उशिरा हे तिघेजण कॉमर्स झोन समोरील मोकळ्या मैदानात दारू पीत होते. यावेळी त्यांची किरकोळ कारणावरून वादावादी झाली. अजिंक्‍य आणि त्याच्या साथीदाराने निखील यांचा बिअरच्या बाटलीने गळा चिरून व डोक्‍यात दगड घालून खून केला. खून करून दोघे फरार झाले होते. बुधवारी सकाळी खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला. येरवडा पोलिसांनी तत्काळ गुन्ह्याचा तपास सुरू केला. येरवडा येथील बंगला नंबर पाच येथे दोघेही आरोपी येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार बाळासाहेब बहिरट व पोलीस नाईक गणेश पाटोळे यांना मिळाली होती. या ठिकाणी गुरुवारी दोघा आरोपींना येरवडा पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. निखीलचा खून केल्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, सहायक पोलीस आयुक्त गणेश गावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद महाजन, पोलीस निरीक्षक गुन्हे अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल लोहार, उपनिरीक्षक राजेंद्र कांबळे, पोलीस कर्मचारी बाळासाहेब बहिरट, हनुमंत जाधव, अजित बेग, शरद बांगर, गणेश पाटोळे, विष्णू सरवदे, सागर कोतवाल, सचिन रणदिवे यांच्या पथकाने गुन्ह्याचा चोवीस तासांच्या आत तपास लावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)