येरळा नदीपात्रात अवैध वाळूसाठा जप्त

पोलीसांच्या धाडीत तीन ट्रॅक्‍टर, दोन जेसीबी, एक चारचाकी ताब्यात

वडूज – बनपूरी (ता.खटाव) गावच्या हद्दीत येरळवाडी धरणालगत येरळा नदी पात्रात अवैध वाळू उपशाच्या ठिकाणी पोलीसांनी धाड टाकून तीन ट्रॅक्‍टर, दोन जेसीबी, एक चारचाकी वाहन व दहा ब्रास वाळू साठा पकडला. या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या युवराज माधवराव पाटील (रा. वडूज ) यास न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

येरळवाडी धरणालगत येरळा नदी पात्रात बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गवळी,कणसे,शिंदे, शेडगे यांनी गुरूवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्याठिकाणी भेट दिली. त्यावेळी त्याठिकाणी पोलीसांनी तीन ट्रॅक्‍टर, दोन जेसीबी, एक चार चाकी वाहन ( क्रमांक एम. एच. 11 ए.बी.14) आढळून आली. त्यावेळी पोलीस आल्याचे दिसताच तेथून ट्रॅक्‍टर व जेसीबी चालकांनी पलायन केले.

या चालकांचा पाठलाग करीत असताना युवराज माधवराव पाटील (रा. वडूज) आढळून आला. त्यावेळी पोलीसांनी त्यास ट्रॅक्‍टर व जेसीबीबाबत अधिक विचारणा केली असता सदरचे ट्रॅक्‍टर व ट्रॉली हे महादेव भाऊसाहेब गोडसे, प्रमोद देशमुख (दोघेही रा. वडूज) समीर बरकडे (रा. अंबवडे) यांचे व जेसीबी विजय सुरेश पवार (रा. उंबर्डे), वैभव किसन साळुंखे (रा. गणेशवाडी) यांचे असल्याचे सांगितले. तसेच अन्य एक चारचाकी वाहन आपलेच असल्याचे सांगितले.

वाहनांच्या सहाय्याने वाळू उपसा करीत असल्याने त्याठिकाणी पाटील हा त्यांना मदत करत असल्याचे आढळून आल्याने सहाय्यक पोलीस अधिक्षक शेख यांनी वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के यांना बोलावून त्यांच्या ताब्यात सदरील वाहने व वाळूसाठा दिला. याबाबत पोलीस नाईक दादासाहेब बळवंत बनकर (शाहूपूरी पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान या धाडीत ताब्यात घेतलेल्या युवराज पाटील यास न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने मंगळवार (ता. 4) पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

खटाव तालुक्‍यातील बेकायदा वाळू उपसा होणाऱ्या ठिकाणी व बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर स्थानिक पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई अभावानेच होताना दिसून येते. गेल्या दोन महिन्यांपूर्वी पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या पथकाने रहिमतपूर रस्त्यावर भरदिवसा वाळू वाहतूक करणाऱ्या एका डंपरवर कारवाई करून गुन्हा दाखल केला होता. गुरूवारी सहाय्यक पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी येरळवाडी धरणालगत येरळा नदीपात्र परिसरात धाड टाकून कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)