दुबई – येमेनमध्ये एका विवाह समारंभावर करण्यात आलेल्या एका मिसाईल हल्ल्यात वधूसह 20 जण मारले गेले असून 40 जण जखमी झाले आहेत. येमेनेच्या उत्तरपश्चिम हाजा प्रांतात झालेल्या या हल्ल्याबाबत माहिती देताना आरोग्य अधिकारी खालिद अल-नाधरी यांनी सांगितले की या हल्ल्यात मरणारांमध्ये महिला आणि मुले यांचे प्रमाण अधिक आहे. हल्ल्यानंतर त्या भागात विमाने फेऱ्या मारत होती असे येमेनचे आरोग्य मंत्री अब्देल हकिम अल काहलान यांनी सांगितले आहे.
हा मिसाईल हल्ला सौदी अरबच्या नेतृत्वाखालील युतीने केला असल्याचा आरोप हुथी बंडखोरांनी केला आहे. बनी किस भागातील अल रका गावातील विवाहसमारंभावर हा मिसाईल हल्ला झाल्याची माहिती अल मसदर या स्थानिक वेबसाईटने दिली आहे. हाजा येथील रिपब्लिकन हॉस्पिटलमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली असून लोकांना रक्तदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. हुथी बंडखोरांवर हल्ले करणाऱ्या सौदीच्या नेतृत्वाखालील सेना नागरिकांवर हल्ले करत असल्याचे आरोप सतत केले आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा