येत्या मार्चमध्ये “टीईटी’ची परीक्षा होण्याची शक्‍यता

संग्रहित छायाचित्र

राज्य परीक्षा परिषदेने शालेय शिक्षण विभागाकडे पाठविला प्रस्ताव

पुणे – राज्य शासनाने शिक्षक होण्यासाठी अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, चालू वर्षात एकदाही परीक्षा झाली नाही. आता पुढील वर्षी मार्चमध्ये ही परीक्षा घेण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केले असून याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे मान्यतेसाठी पाठविला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकाची नोकरी करण्यासाठी शासनाने उमेदवारांना शिक्षक पात्रता परीक्षेबरोबरच (टीईटी) शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षाही उत्तीर्ण होण्याचे बंधन घातले आहे. त्यात शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल कार्यान्वित करण्याचा निर्णय 20 जून 2018 रोजी घेतला आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनाच या पोर्टलवर नोंदणी करण्यात येईल, असेही शासनाने जाहीर केलेले आहे.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा वर्षातून तीन वेळा घेण्याचे नियोजन अगदी सुरुवातीला करण्यात आले होते. त्यानंतर दोन वेळाच परीक्षा घेण्यावर शासनाने शिक्कामोर्तब केले. पहिली परीक्षा डिसेंबर 2017 मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेला 1 लाख 96 हजार उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते. त्यातील 1 लाख 71 हजार उमेदवारांनीच परीक्षा दिली होती. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नोंदणीही केलेली आहे. चालू वर्षात अद्याप एकदाही परीक्षा झालेली नाही. आता थेट पुढील वर्षीच मार्चमध्ये ही परीक्षा घेण्याच्या हालचाली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सुरू केलेल्या आहेत.

राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा मार्चमध्ये घेण्याबाबतचा प्रस्ताव पाठविलेला आहे. मात्र, अद्याप शासनाकडून त्याच मान्यता मिळालेली नाही. शासनाने मान्यता दिल्यानंतर तत्काळ पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)