येत्या दोन दिवसांत अतिवृष्टीचा इशारा

सध्या परिस्थिती नियंत्रणात, नदीकाठच्या गावात होड्या सज्ज

नगर – गेल्या सहा-सात दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर अधूनमधून कमी होत असताना मुक्काम मात्र वाढता दिसत आहे. येत्या दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्रात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, विशेषतः नदीकाठच्या गावात सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नगर जिल्ह्यात आज सकाळपासून भंडारदरा वगळता सर्वत्र पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. सध्या जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आपत्ती व्यवस्थापनच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रवरा, गोदावरी, भीमा, मुळा, घोडनदी, कुकडी, सीना या नद्यांवरील धरणांतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडावा लागत असून, त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. उत्तर महाराष्ट्रात जर पावसाचा जोर ओसरला नाही तर आणखी विसर्ग वाढवावा लागणार आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्‍यता आहे. नदीकाठावरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याची सूचना देण्यात आली आहे. गरज पडल्यास नागरिकांच्या राहण्याची सोय करण्यासाठी प्राथमिक शाळांचा वापर करावा.

आपत्ती व्यवस्थापनच्या वतीने आकाशवाणीद्वारेही लोकांना सूचना देण्यात येत आहेत, तसेच जिल्हा पोलीस प्रशासनालाही नागरिकांना आवाहन करण्याबाबत कळविले आहे. जिल्ह्यात 223 गावे नदीकाठी वसली असून, त्यापैकी काही गावांतील उपलब्ध असलेल्या पट्टीच्या पोहणाऱ्यांची यादी सज्ज ठेवण्यात आली असून जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, राहुरी, नेवासा, कोपरगाव, श्रीरामपूर या सहा तालुक्‍यांत होड्याही तयार ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय आपत्ती व्यवस्थापनशी संपर्क करण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1077 दिला असून, त्याव्यतिरिक्‍त 0241-2323444 या क्रमांकाशी संपर्क साधूनही माहिती देता येणार आहे.

याशिवाय नागरिकांनी धोकादायक इमारतींचा आश्रय घेऊ नये, पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये, नदीपात्रातील पूरस्थितीबाबत नजीकच्या पोलीस स्टेशनला कळवावे. पाण्याचे क्षेत्र असलेल्या धबधबा, तलाव, धरण, पूल, नदी, आदी ठिकाणी गर्दी करू नये, तसेच योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)