यू.पी.एस. मदान राज्याचे नवे मुख्य सचिव 

मुंबई  – राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन यांची राष्ट्रपतींकडून देशाच्या लोकपाल समितीवर सदस्य म्हणून निवड झाल्यामुळे मुख्य सचिवपदी कोणाची निवड होणार याबाबतची असलेली उत्सुकता आता संपली आहे. जैन यांच्या जागी वित्त विभागाचे सचिव यू.पी.एस. मदान यांची राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

डी.के. जैन यांच्या दिल्लीतील नियुक्तीमुळे रिक्त झालेल्या मुख्य सचिवपदासाठी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा सुरु होती. सेवाज्येष्ठतेनुसार सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव यु.पी.एस मदान, केंद्रात माजी सैनिक कल्याण खात्याच्या सचिव संजीवनी कुट्टी, केंद्रीय महसूल सचिव अजय भुषण पांडे, मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता, गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय कुमार यांचा क्रम लागतो. यापैकी गाडगीळ यांना यापूर्वीच मुख्य सचिवपद नाकारण्यात आले होते.

पांडे व कुट्टी हे दोन्ही अधिकारी केंद्रात सचिवपदावर असून राज्यात येण्यास उत्सुक नव्हते. त्यामुळे मदान, मेहता व संजय कुमार यांच्यातच चुरस होती. मदान यांच्याऐवजी अजोय मेहता हेच मुख्यमंत्र्यांच्या अधिक पसंतीचे मानले जात होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेवाज्येष्ठतेनुसार अजोय मेहता यांच्याऐवजी मदान यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. मदान हे 1983च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून सध्या ते वित्त विभागाचे सचिव होते. मुंबई महानगर विकास प्राधिकरण आणि महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणात त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळलेली आहे. मदान हे ऑक्‍टोबरमध्ये निवृत्त होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)