युवा सक्षमीकरणासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज

नगर – युवा सक्षमीकरणासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असून, युवा पिढीला रुचेल व आवडेल अशा पध्दतीने विविध सामाजिक उपक्रमांत त्यांना सहभागी करून घेतले पाहिजे. युवक ही देशाची खरी शक्ती असून, युवकांना सक्षम करण्यासाठी नेहरू युवा केंद्र व जय युवा ऍकॅडमीचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन नागरदेवळेचे सरपंच राम पानमळकर यांनी केले.
नगर तालुक्‍यातील नागरदेवळे येथे नेहरू युवा केंद्र आयोजित पडोस युवा नेता कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी पानमळकर बोलत होते. यावेळी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे, क्रीडा अधिकारी नंदकुमार रासने, जिल्हा बॅंकेच्या बचतगट कक्ष अधिकारी विद्या तन्वर, जय युवा ऍकॅडमीचे अध्यक्ष ऍड. महेश शिंदे, शासनाचा राज्य आदर्श युवती पुरस्कार विजेत्या जयश्री शिंदे, मंजूश्री रॉय, पोपट बनकर, कांतीलाल जाडकर, सलीम सय्यद, विजय घोलप, रेखा नगरे, रजनी ताठे, स्वाती बनकर, दिनेश शिंदे, आदी उपस्थित होते.
प्रारंभी, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत तुलसीला पाणी अर्पण करून कार्यशाळेचे उद्‌घाटन करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत महापुरुषांच्या चरित्रावर आधारित पुस्तके भेट देऊन करण्यात आले. तसेच, यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते स्वयंरोजगार प्रशिक्षण अंतर्गत शिवणकला प्रशिक्षण वर्गाचे उद्‌घाटन करण्यात आले. क्रीडा अधिकारी नंदकुमार रासने यांनी युवा वर्ग सोशल मीडियात गुरफटला असून, सुदृढ शरीरासाठी युवकांनी मैदानी खेळ खेळले पाहिजे. शरीर सुदृढ असल्यास कोणतेही कार्य उत्तम प्रकारे करता येत असल्याचे सांगून शासनाच्या क्रीडाविषयक योजनेत युवकांना सहभागी होण्याचे आवाहन केले.
बाबाजी गोडसे यांनी योगाचे महत्त्व विशद करून निरोगी जीवन जगण्यासाठी प्राणायाम, सूर्यनमस्कार व विविध आसने शास्त्रोक्त पध्दतीने केल्यास दवाखान्याचा खर्च वाचणार असल्याचे सांगितले. ऍड. महेश शिंदे म्हणाले की, आज वैचारिक परिवर्तनाची गरज असून शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण घेऊन प्रत्येक महिला स्वयंपूर्ण बनली पाहिजे. प्रत्येकाने समाजकार्यात हातभार लावणे आवश्‍यक असून, सर्वांनी एकत्र येऊन संघटितपणे शासनाच्या योजना राबविल्यास बदल घडणार असल्याचे सांगितले.
जयश्री शिंदे यांनी समाजात स्त्रीभ्रूणहत्या थांबविण्यासाठी महिलांनी पुढाकार घेणे आवश्‍यक आहे. मुलगी वाचवा व शिकवा हे अभियान शासनाला राबविण्याची वेळ येत असल्याचा खेद व्यक्त करून पर्यावरण संवर्धन, स्त्रीभ्रूणहत्या, मतदार जागृती, ग्रामस्वच्छता, महिला सक्षमीकरण व स्वयंरोजगार, आदी विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी नागरदेवळे पंचक्रोशीतील युवक, युवती, महिला, आशा स्वयंसेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संदीप पानमळकर, धीरज ससाणे, रशीद शेख, गणेश पटेकर, आदींनी परिश्रम घेतले. या उपक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी, क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्‍वर खुरांगे, ऍड. भानुदास होले यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)