युवा खेळाडूंना पुरेशी संधी देणार- विराट कोहली

file photo

मधल्या फळीची फेररचना आवश्‍यक

राजकोट: भारतीय संघाच्या मधल्या फळीची फेररचना करण्याचे काम बाकी असून तेवढी एक बाब सोडल्यास भारतीय कसोटी संघाबाबत काही समस्या राहिली नसल्याचा विश्‍वास भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्‍त केला आहे. तसेच युवा खेळाडूंना त्यांची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी पुरेशी संधी दिली जाईल, असेही त्याने सांगितले.

वेस्ट इंडीजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिली कसोटी उद्या (गुरुवार) सुरू होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांशी बोलताना विराटने आपली मते मोकळेपणाने व्यक्‍त केली. भारतीय संघाच्या केवळ वरच्या फळीबाबत प्रयोग करण्यास वाव असल्याचे सांगून विराट म्हणाला की, कसोटी क्रिकेटमध्ये उद्याच पदार्पण करीत असलेल्या 18 वर्षीय पृथ्वी शॉकडून मोठ्या अपेक्षा आहेत. नियमित सलामीवीर लोकेश राहुलच्या साथीत पृथ्वी शॉ उद्या भारताची आघाडी सांभाळेल अशी अपेक्षा आहे.

भारताची वरची फळी प्रयोगासाठी मोकळी असून तेथे युवा खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आम्ही पुरेशी संधी आणि योग्य तेवढा कालावधी उपलब्ध करून देऊ, असे सांगून विराट म्हणाला की, युवा खेळाडूंचा आत्मविश्‍वास उंचावण्यासाठी आम्ही त्यांना शक्‍य तितके साहाय्य करू. आत्मविश्‍वासाच्या अभावी हे खेळाडू अपयशी ठरले असे होता कामा नये. आम्ही मायदेशातच हे प्रयोग करू शकतो. त्यामुळे या मालिकेत असे प्रयोग आम्ही करणारच आहोत.

खालच्या फळीकडून भारतीय संघाला बहुमोल योगदानाची अपेक्षा असल्याचे सांगून विराट म्हणाला की, ऋषभ पंत नवा असला तरी अश्‍विन व जडेजा यांनी मायदेशात इतक्‍या वेळा चमकदार कामगिरी बजावली आहे, की त्यांना त्याची केवळ पुनरावृत्ती करण्याचे काम करायचे आहे. वरच्या फळीच्या नूतनीकरणाशिवाय विंडीजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांत आम्हाला आणखी फार काही करायचे आहे असे मला वाटत नाही.

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेतील पराभवांबद्दल विराट म्हणाला की, आम्ही गरज भासेल तेव्हाच संघात बदल केले आहेत. अखेर तुमच्या हातात सर्वोत्तम 11 खेळाडूंचा संघ असणे आवश्‍यक असते. आम्ही प्रत्येक सामन्याच्या वेळचे हवामान, खेळपट्टी व प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू याचा अभ्यास करूनच संघनिवड करीत असतो. एखाद्या खेळाडूला वगळले असल्यास त्याला त्याच्यावर अन्याय झाला आहे असे वाटलेले नाही. इंग्लंडविरुद्धच्या पराभवाबद्दल सांगायचे झाल्यास आम्ही कोठे कमी पडलो हे सर्वांनाच माहीत आहे.

सगळे निर्णय एकाच ठिकाणी होत नाहीत

करुण नायरला वगळल्याबद्दल विविध स्तरांवरून सुरू असलेल्या टीकेबद्दल विराट कोहली म्हणाला की, सगळे निर्णय एकाच ठिकाणाहून होत नसतात. त्यामुळे या विषयावर मी कोणतीही टिप्पणी करू शकणार नाही. प्रत्येक बाबतीत कर्णधाराचे ऐकले जातेच असे नाही. संघनिवड ही माझी एकट्याची किंवा संयुक्‍त जबाबदारी नसून निवड समितीची जबाबदारी व अधिकारही आहे. त्यात अन्य कोणीही ढवळाढवळ करणे योग्य नाही. मी कधीही निवड समितीच्या कामात हस्तक्षेप करीत नाही. शिवाय निवड समिती अध्यक्षांनी जर करुणशी चर्चा केली असेल, तर त्यापेक्षा आणखी काही करण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. किंवा त्या विषयावर पुन्हा येथे चर्चा करण्याची काही आवश्‍यकता नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)