युवा ऑलिम्पिक क्रीडास्पर्धा : भारतीय महिला हॉकी संघाचा दणदणीत विजय

 वानुआतूचा 16-0 अशा फरकाने धुव्वा

ब्यूनोज आयर्स:  आक्रमण, बचाव आणि समन्वय अशा तीनही क्षेत्रांमध्ये निर्विवादपणें सरस कामगिरी करणाऱ्या भारताच्या 18 वर्षांखालील महिला हॉकी संघाने दणदणीत विजयाची नोंद करताना येथे सुरू असलेल्या युवा ऑलिम्पिक क्रीडास्पर्धेतील फाईव्ह-अ-साईड महिला हॉकी स्पर्धेतील आगेकूच कायम राखली.

-Ads-

 

भारतीय महिलांनी वानुआतू संघाचा 16-0 असा धुव्वा उडविला. अव्वल आघाडीवीर मुमताझ खानने 4 गोल, तसेच चेतनाने 3 गोल करताना भारतीय महिला संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. बलजीत कौर व रीत यांनी प्रत्येकी दोन गोल, तसेच इशिका चौधरी, लालरेमसियामी आणि सलिमा टेटे यांनी प्रत्येकी एक गोल करीत त्यांना सुरेख साथ दिली. या स्पर्धेत विशेष भरात असलेली आघाडीवीर लालरेमसियामीने दुसऱ्याच मिनिटाला भारतीय महिला संघाचे खाते उघडले. त्यानंतर तीसच सेकंदांनी रीतने भारताचा दुसरा गोल केला, तर एका मिनिटानंतर कर्णधार सलिमा टेटेने तिसरा गोल करीत चौथ्या मिनिटाला भारताला 3-0 असे आघाडीवर नेले.

 

बलजीत कौरने पाचव्या मिनिटाला लागोपाठ दोन गोल करताना भारताची आघाडी 5-0 अशी वाढविली. त्यानंतर चेतनाने खेळाची सूत्रे हाती घेत पहिला गोल केला. पाठोपाठ रीतने दुसरा गोल करीत भारताला 7-0 असे आघाडीवर नेले. मुमताझने आठव्या आणि लालरेमसियामीने 10व्या मिनिटाला लक्ष्यवेध करून पहिल्या सत्राअखेर भारतीय महिलांचे वर्चस्व कायम राखले. दुसऱ्या सत्रातील पहिल्या पाच मिनिटांमध्ये भारताने पाच गोल केले. यात मुमताझने तीन, तर सलिमा व चेतना यांच्या प्रत्येकी एका गोलचा समावेश होता. चेतनाने 17व्या मिनिटाला भारताचा 15व्या गोल केल्यावर इशिकाने अखेरच्या मिनिटाला 16व्या गोलची नोंद करीत भारताच्या एकतर्फी विजयाची निश्‍चिती केली. गोलरक्षक वगळता भारतीय महिला संघातील सर्व खेळाडूंनी गोल केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)