युवाशक्‍ती हीच खरी महाशक्‍ती

कोट्यवधी तरुणांचे स्फूर्तिस्थान म्हणजे स्वामी विवेकानंद. स्वामीजींचा युवाशक्तीवर खूप विश्‍वास होता आणि हे ही पुन्हा सिद्ध होत आहे की देशाच्या सर्वागीण विकासासाठी युवाशक्ती महत्त्वाची ठरते. या युवकांच्या हातून राष्ट्रउभारणीचे महत्त्वपूर्ण कार्य होत आहे. समाजकारणापासून राजकारणापर्यंतच्या सर्वच क्षेत्रात युवकांची भूमिका मोलाची आहे.

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत सर्वच स्तरांतील लोकांचे जीवन गतिमान झाले आहे. जीवनात आलेल्या या गतीमुळे आपली स्थिती भांबावल्यासारखी झाली आहे. ज्ञानार्जन करू पाहणाऱ्या तरुणांची स्थितीही याहून वेगळी नाही. अशा स्थितीत मनाला स्थैर्य देऊन आपल्या प्रगतीला सहाय्यक ठरणाऱ्या विचारांची निस्सीम गरज आहे. अशावेळी फियरलेस मंक म्हणजेच स्वामी विवेकानंद यांचे विचार आपल्याला मदत करतात व नवीन चैतन्य ही देतात. तरुणाईत प्रचंड विश्‍वास असल्यामुळे ते नेहमी सांगत की सकारात्मक विचारांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते व त्यामुळे जीवनाचे नंदनवन होऊ शकते, परंतु केवळ सकारात्मक विचार उपयोगाचे नसून, माणसाला आपल्या ध्येयाची निश्‍चितीही करता आली पाहिजे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एकदा ध्येय ठरले की, कार्य करण्याची दिशा आपोआप गवसून जाईल. भविष्याचा वेध स्वामीजींनी आधीच घेतला होता म्हणूनच तरुणांना संघटित कार्य करण्याचा मंत्र स्वामीजींनी दिला आहे. संघटित कार्यात सहभागी झाल्याने आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाचा वेग वाढतो व समाजाचाही विकास होतो. व्यक्तीविकास आणि समाज विकासाची प्रक्रिया ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. यासाठी शक्तीदायी विचारांची सोबत आवश्‍यक असते. हे लक्षात ठेवून आपण सर्व तरुणांनी अशी सेवा केली पाहिजे की त्याचा आदर्श घेवून नवीन पिढीने तन-मन आणि धनापासून भारताला संघटित व शक्तिशाली बनविण्यासाठी स्वतःला अर्पण केले पाहिजे.

स्वामीजींची अजून एक गोष्ट आपण स्वीकारणे गरजेचे आहे ती म्हणजे नाकारात्मक्तेतून मुक्त होणे व मुक्त रहाणे. कोणत्याही अनैतिकतेचे बंदिवान होऊ नका. व्यसने तुम्हाला गुलाम करतील. भ्रष्ट्राचार तुम्हाला कमजोर करील. आळस तुम्हाला पराक्रमशून्य करील. तुमचे हे व असे इतर शत्रू तुमच्यावर गुहेतील श्‍वापदाप्रमाणे टपून आहेत. सत्वशोध, स्वत्वबोध या युवकांच्या जीवनातील नियामक शक्ती असल्या पाहिजेत.आज कोणीही काहीही म्हणोत पण खऱ्या अर्थाने भारताला सुपर पॉवर बनवण्याचे स्वप्न (व्हिजन 2020) हे स्वामीजींनी 1880 मधेच पहिले होते. तरुणांशिवाय ते अशक्‍य आहे याची जाण ठेवून देशासाठी वाहून घेण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. त्यासाठी धाडस गरजेचे आहे कारण हे जग फक्त धाडशी लोकांकरिता आहे.

– भगवान केशव गावित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)