शिक्रापूर/कोरगाव भीमा- कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील वाडा पुनर्वसन येथे राहणारी युवती बेपत्ता झाल्याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता; परंतु 22 एप्रिलला या युवतीने आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पूजा सुरेश सकट (वय 19) असे या युवतीचे नाव आहे. तर ऍड. सुधीर ढमढेरे, विलास श्रीधर वेदपाठक, गणेश विलास वेदपाठक, नवनाथ ज्ञानोबा दरेकर, सोमनाथ फक्कड दरेकर, विलास काळूराम दरेकर, सुभाष गणपत घावटे, गोरक्ष पाटीलबुवा थोरात, गणेश गोरक्ष थोरात अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत. पूजा ही 21 एप्रिल रोजी बेपत्ता झाल्याची घटना होती. त्या दिवशी रात्री उशिरा पूजा बेपत्ता झाल्याबाबत शिक्रापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता; मात्र 22 एप्रिलला सकाळच्या सुमारास पूजाचा मृतदेह वाडा पुनर्वसन येथील एका विहिरीमध्ये आढळून आला.
याबाबत दिलीप नानासाहेब सकट (रा. केडगाव जि. अहमदनगर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यात म्हटले आहे की, माझे भाऊ सुरेश सकट हे कोरेगाव भीमा येथे राहतात. त्यांना त्यांचे घर सोडून जाण्याबाबत काही लोक धमकी देत असल्याबाबत सुरेश यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती; परंतु प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यानंतर कोरेगाव भिमा येथे झालेल्या दंगलीच्या दुसऱ्या दिवशी दोन जानेवारी रोजी काही आरोपींनी त्यांचे घर जाळून टाकले.
पूजा व तिचा भाऊ जयदीप यांनी हे घर जळताना काही आरोपींना पाहिले होते. त्या आरोपींनी त्यांचादेखील पाठलाग केला होता, तेव्हा पूजा व जयदीप पळून गेले. त्यानंतरही घर जाळणाऱ्या आरोपींनी त्या दोघांना मारण्याच्या धमक्या देत, अश्लील व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल केले होते. दोन फेब्रुवारी रोजी विलास वेदपाठक व समाधान सातपुते यांनी पूजाचे वडील सुरेश सकट यांना व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याबाबत देखील शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
20 एप्रिल रोजी सुरेश सकट व त्यांचा मुलगा गावी गेले होते. अन् पूजा ही घरातून गायब झाली. त्यामुळे 21 एप्रिल रोजी त्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह कोरेगाव भीमा जवळील वाडागाव येथील एका विहिरीमध्ये आढळून आला. पूजा हिच्या आत्महत्येस वरील सर्वजण जबाबदार असल्याबाबत दिलीप सकट यांनी फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी सर्व आरोपींविरूद्ध भादंवि कलम 306, 34, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदाचे 2015चे सुधारित कलम 3 (2) (5) नुसार गुन्हे दाखल केले असून पुढील तपास आर्थिक गुन्हे विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी भाकरे हे करीत आहेत.
- यापूर्वी दिलेली धमकी
11 फेब्रुवारी रोजी सुभाष घावटे यांनी सुरेश सकट यांना दमबाजी करून “विलास वेदपाठक यांची तुझ्या घराच्या बाजूला जमीन आहे; परंतु तुझ्या पत्र्याच्या शेडमुळे त्यांच्या जमिनीची किंमत होत नाही. त्यामुळे तू घर सोडून जा, नाहीतर तुझे घर ज्याप्रमाणे जाळले त्याप्रमाणे तुला व तुझ्या घरच्यांना जाळून मारून टाकू’ अशी धमकी दिली. सुरेश सकट यांनी तसे पोलिसांना कळवले होते. तसेच पूजा सकट हिने 11 एप्रिल रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासमोर या आरोपींनी काही दिवसांपूर्वी घर जाळल्याचे प्रत्यक्ष पाहिले असल्याचे जबाबात सांगितले. त्यामुळे या लोकांच्या मनात तिच्याबाबत राग असल्याचे म्हटले आहे. - आज सकाळी पूजा सकट हिच्या पार्थिवावर कोरेगाव भीमा येथील स्मशानभूमीत पोलीस संरक्षणात अंतसंस्कार करण्यात आले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, पोलीस उपअधीक्षक संदीप बांगर, गणेश मोरे, बरकत मुजावर यांच्यासह 100 पेक्षा जास्त पोलीस हजर होते.
- 1 जानेवारीपासून कोरेगाव भीमा सुन्न
जानेवारीत झालेल्या दंगलीनंतर कोरेगाव भीमा व परिसरात अनेक लहान मोठ्या गुन्ह्याच्या घटना घडत असल्याने गावाचे व परिसरातील वातावरण खराब झाले आहे. गणेश फडतरे याची वाईन शॉपमधील मारामारी त्यानंतर लगेचच पूजा सकट हिच्या मृत्युची घटना. आधीच एक जानेवारीपासून मोठा फौजफाटा तैनात असताना आजच्या घटनेमुळे कोरेगाव भीमा व परिसरात कोणताही अनुचित घडू नये, यासाठी पोलिसांच्या वतीने 100 पेक्षाही जास्त पोलीस, अधिकारी व होमगार्ड गावात आल्याने गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. यामुळे गावात कमालीची शांतता असून बाजारपेठा ओस पडल्या आहेत. - पूजा सकट हिच्या केससंदर्भात आत्महत्या किंवा घातपात, असे आता काहीच म्हणू शकत नाही. पण पोलीस यंत्रणा गांभीर्याने तपास करीत आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल 306/34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
-रविंद्र गलांडे, पोलीस निरीक्षक शिक्रापूर
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा