युवतीचा विनयभंग करणाऱ्यास बेड्या

वाकी -महाविद्यालयीन युवतीचा पाठलाग करून तिला भररस्त्यात अडवून मला तुझ्याशी फक्त पाच मिनिटे बोलायचे आहे, असे म्हणत तिला शिवीगाळ, दमदाटी करून तिच्याशी अत्यंत आक्षेपार्ह हावभाव करत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पुणे – नाशिक महामार्गावरील मेदनकरवाडी ( ता. खेड ) गावच्या हद्दीतील बालाजीनगर येथे गेल्या दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या छेडछाड प्रकरणी आणि तीच्या भावास व वडिलांना जिवंत सोडणार नाही, अशी अशी धमकी दिल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी शुक्रवारी (दि. 29) महाळुंगे इंगळे येथील एका एकवीस वर्षीय तयुणास बेड्या ठोकल्या आहेत.
सूरज राजेंद्र भांगरे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पीडित युवती ही मूळची मेदनकरवाडी (ता. खेड) येथील कायमची रहिवासी असून, ती पिंपरी – चिंचवड येथील डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये प्रथम वर्षामध्ये शिक्षण घेत आहे. बुधवारी (दि. 27) कॉलेज सुटल्यानंतर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ती मेदनकरवाडी गावच्या हद्दीतील बालाजीनगर बस थांब्यावर उतरून घरी जात होती. त्यावेळी सूरज हा तिचा पाठलाग करत तिच्या पाठीमागे आला. त्याने तिला भर रस्त्यात अडवून मला तुझ्याशी फक्त पाच मिनिटे बोलायचे आहे, असे म्हणून तिला थांबविले. तू मला खूप आवडतेस, असे म्हणून अत्यंत आक्षेपार्ह हावभाव करत तिचा हात धरून तीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करत तिचा विनयभंग केला. मी तुझे नाव खराब करीन, तुझ्या भावास व वडिलांना जिवंत सोडणार नाही, असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी केली.
पीडित युवतीने याबाबत चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सुरज भांगरे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्या मुसक्‍या आवळल्या आहेत. पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)