युवकाचा मित्रांकडून गळा आवळून खून

कराड तालुक्‍यातील घटना : कवठेतील युवकाचा मृतदेह भुयाचीवाडी बंधाऱ्यात

उंब्रज – कवठे, ता. कराड येथून सहा दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या अठ्ठावीस वर्षीय युवकाचा गळा आवळून खून करुन मृतदेह भुयाचीवाडी, ता. कराड गावचे हद्दीत असणाऱ्या बंधाऱ्यात टाकल्याची घटना शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने उंब्रजसह परिसरात खळबळ उडाली आहे.

वैभव आनंदराव घार्गे (वय 28, रा. नवीन कवठे, ता. कराड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर पवन ऊर्फ प्रविण शामराव साळुंखे, राजू ऊर्फ भिकोबा मारुती मसुगडे दोघे रा. नवीन कवठे, ता. कराड असे संशयितांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कवठे, ता. कराड येथील वैभव घार्गे हा रविवार, दि. 25 नोव्हेंबर रोजी रात्री 7 वाजण्याच्या सुमारास जेवायला जातो, असे सांगून घरातून निघून गेला. तो आलाच नाही. याबाबत तो बेपत्ता असल्याची फिर्याद वैभव याचे वडील यांनी उंब्रज पोलिस ठाण्यात शुक्रवारी दिली होती.

दरम्यान, उंब्रज पोलिसांना शनिवारी मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे वैभव घार्गे यांचा खून करुन मृतदेह भुयाचीवाडी येथील बंधाऱ्यात टाकल्याची माहिती मिळाली. यावरुन उंब्रज पोलिसांनी संशयित म्हणून पवन ऊर्फ प्रविण साळुंखे रा. कवठे, ता. कराड यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली.

यावेळी त्यानी दि. 25 रोजी रात्री मृत वैभव घार्गे याने प्रविण साळुंखे यास फोन करुन मला पैसे दे, नाही तर दारु दे असा तगादा लावला होता. यावेळी प्रविण याने त्यास नकार दिला. मात्र वारंवार फोन करुन वैभव पैशाची मागणी करु लागल्याने प्रविण याने रविवारी सायंकाळी फोन करुन दारु पिण्यासाठी भुयाचीवाडी येथील बंधाऱ्यावर बोलविले. प्रविण याने त्याचा साथीदार राजू मसुगडे यास वैभव याला कवठे येथून घेऊन येण्यास सांगितले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वैभव घार्गे, प्रविण साळुंखे आणि राजू मसुगडे हे बंधाऱ्याजवळ दारु पिण्यासाठी बसले.

यावेळी वैभव याने जुन्या भांडणाचा वाद उकरुन काढून वादावादी करण्यास सुरुवात केली. यावेळी प्रविण व राजू यांनी दोरीच्या सहाय्याने वैभव यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह बंधाऱ्यावर नेवून बंधाऱ्याला लावण्यात येणाऱ्या रिकाम्या वक्र दरवाजाला बांधून बंधाऱ्यात फेकून दिला असल्याची प्राथमिक माहिती संशयित आरोपींनी पोलिसांना दिली.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उंब्रज पोलिस ठाण्याचे सपोनि प्रताप भोसले व पोलिस कर्मचारी पोलिस उपनिरीक्षक एम. के. आवळे, साह्यक फौजदार शिवाजी जगताप, हवालदार सतीश मयेकर, देवकुळे, भोसले, शिंदे, कुंभार तसेच कराड शहर पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी जावून शोध मोहीम सुरु केली. सकाळपासून सुरु केलेल्या शोध मोहीमेस दुपारी यश आले.

लोखंडी वक्र दरवाजाला बांधलेला मृतदेह सडलेल्या अवस्थेत मिळून आला. मृतदेहाचा जागेवर पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कराड येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. घटनास्थळी सायंकाळी पोलिस उपविभागीय अधिकारी नवनाथ ढवळे यांनी भेट दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)