युनिव्हर्सल स्पोर्टस अॅकॅडमीला विजेतेपद

– “वेस्ट झोन टी-ट्‌वेंटी’ क्रिकेट स्पर्धा
पिंपरी, (प्रतिनिधी) – युनिव्हर्सल स्पोर्टस अॅकॅडमीच्या वतीने आयोजित केलेल्या “वेस्ट झोन टी-ट्‌वेंटी’ क्रिकेट स्पर्धेत चिंचवडच्या युनिव्हर्सल स्पोर्टस अॅकॅडमीच्या 12 वर्षाखालील मुलांच्या संघाने विजेतेपद पटकाविले, तर ठाणे येथील सिंघानिया क्रिकेट अॅकॅडमीच्या संघाने उपविजेतेपद पटकाविले.

पाचगणी येथे ही स्पर्धा पार पडली. युनिव्हर्सल स्पोर्टस अॅकॅडमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना 18 षटकांत 106 धावांत सिंघनिया संघाचे सर्व फलंदाज बाद केले. सिंघनिया संघाच्या अय्यर याने एकाकी लढत देत 48 धावा केल्या. 107 धावांचे लक्ष्य असलेल्या युनिव्हर्सल अॅकॅडमी संघाच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत लक्ष्य अधिक सोपे करून दिले. 15 षटकांत 4 गडी गमावत 107 धावसंख्या गाठली. विजेत्या संघाच्या निखिल साळके याने तीन चौकार आणि एका षटकारासह 28 धावा केल्या, तर संघाचा कर्णधार सुशांत कांबळे याने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत 35 धावा केल्या.

मालिकेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संघातील खेळाडूंना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये युनिव्हर्सल अॅकॅडमी संघातील रोहित ठोकल (उत्कृष्ट फलंदाज), कपिल नाईक (उत्कृष्ट गोलंदाज), रजत चासकर (उत्कृष्ट क्षेत्ररक्षक) आणि सुशांत कांबळे (स्टार आयकॉन) यांना गौरविण्यात आले. विजेत्या संघातील खेळाडुंना रणजित मंडल, प्रविण गायकवाड आणि अक्षय देव या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)