युती ही भाजपची मजबुरी नाही; भाजपही स्वबळावर निवडणूक लढवेल

सुधीर मुनगंटीवार यांचे शिवसेनेला प्रत्युत्तर


युतीत धूसफूस कायम

मुंबई – युती ही भाजपची मजबुरी नाही. युतीचा निर्णय भावनेवर आधारीत नाही तर तर्क आणि आकड्यांवर होईल. मात्र, शिवसेना युतीला तयार नसेल तर भाजप स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाऊन सत्ता मिळवेल, असा इशारा देत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिले. मुनगंटीवार यांच्या इशाऱ्यामुळे युतीमधील धुसफूस कायम असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात रंगली आहे.

2014 पासून केंद्रात आणि राज्यात सत्तेत आल्यापासून भाजपने शिवसेनेला सापत्नभावाची वागणूक दिली. त्यामुळे भाजपला शह देण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. शिवसेनेच्या स्वबळाच्या घोषणेने भाजपमध्ये अस्वस्थता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सुधीर मुनगंटीवार यांनी विधिमंडळ अधिवेशनात शिवसेनेसोबत युती होणारच असे ठासून सांगितले.

मात्र, शिवसेना युतीबाबत फारशी गंभीर नाही. त्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही रविवारी एका कार्यक्रमात भाजपाने कितीही मुका घेण्याचा प्रयत्न केला तरी युती होणार नाही, शिवसेना स्वबळावरच निवडणूक लढविणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यापार्श्वभूमिवर आज पत्रकारांशी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपाची भूमिका मांडली. युतीचा निर्णय भावनेवर आधारीत नाही तर तर्क आणि आकड्यांवर होईल. तूर्तास तरी या विषयावर दोन्ही बाजूच्या नेत्यांमध्ये कोणतीही चर्चा सुरू झालेली नाही, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)