‘युती’च्या ‘नीती’वरच कोथरूडचे भवितव्य

राजकीय चर्चांना सामूहिक उधाण (कोथरूड विधानसभा मतदार संघ)

पुणे/कोथरूड – आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोथरूड मतदार संघातील वातावरण तापू लागले असून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अनेक कार्यक्रमांतून असणाऱ्या त्यांच्या उपस्थितीमधून हे सध्या पाहायला मिळत आहे.

2014 च्या निवडणुकीत युती तुटल्यानंतर भाजपचा आमदार कोथरूड मतदारसंघातून निवडून आला. आता मात्र, आगामी 2019 च्या निवडणुकांसाठी सेना-भाजप युती होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यामुळे युती झाली तर, पुन्हा हा मतदारसंघ जागा वाटपात शिवसेना कोणत्याही परिस्थितीत सोडवून घेईल, असे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. तसे झाल्यास पुन्हा शिवसेनेचा आमदार कोथरूडला होईल, अशी आशा व्यक्‍त केली जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीमुळेही राष्ट्रवादी-मनसे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. हे दोन पक्ष एकत्र आल्यास कोथरूडची जागा मनसेला सोडण्यात येईल, असे बोलले जात आहे. असे झाले तर, मनसेची ताकद वाढण्यास मदत होणार असून येथील लढत रंगतदार होऊ शकते. गेल्या वेळेच्या निवडणुकीतही मनसेने या भागात जोरदार आघाडी घेतली होती. या जर तरच्या गोष्टी असल्या तरी प्रत्येक पक्षाच्या इच्छुकांनी चाचपणी सुरू केली असून गाठीभेटीही सुरू केल्याचे दिसून येत आहे.

शिवाजीनगर मतदारसंघातून वेगळा होऊन निर्माण झालेल्या कोथरूड मतदारसंघाच्या पहिल्या 2009 च्या निवडणुकीच्या वेळी कोथरूडचा पहिला आमदार कोण होणार, अशी उत्कंठा सर्वांनाच होती. सेना-भाजप युतीचे तिकीट म्हणजे कोथरूडचे आमदारपद नक्‍की, असे त्यावेळी मानले जात असले तरी मनसेचे वारेही त्या सुमारास जोरात वाहत होते. सेनेतील इच्छुकांवर मात करत चंद्रकांत मोकाटे यांनी उमेदवारी मिळवली आणि विजय पटकावत कोथरूड मतदारसंघाचे पहिले आमदार झाले. या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपचे अण्णा जोशी यांना उमेदवारी देत आम्हीही ब्राह्मण उमेदवार देतो हे दाखवून दिले, पण त्याचा फारसा फायदा राष्ट्रवादीला झाला नाही. मनसेचे वारे असल्याने या निवडणुकीत मनसेचे किशोर शिंदे यांनी चांगली लढत दिली होती तर, अपक्ष उमेदवार दीपक मनकर यांनी निर्णायक मतदान घेतले होते.

2014 च्या निवडणुकीत युतीची झालेली फाटाफूट व मोदी लाट यामुळे सर्व राजकीय गणितेच बदलून गेली. सेना-भाजप एकमेकांसमोर उभे ठाकल्यानंतर बालेकिल्ल्यात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या भागात भाजपला मानणारा वर्ग आणि मोदी लाट यामुळे भाजपच्या उमेदवार मेधा कुलकर्णी यांनी आरामात विजयश्री खेचून आणली. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा आमदार होण्याचे चंद्रकांत मोकाटे यांचे स्वप्न अपुरे राहिले. 2009 च्या सुमारास असलेली मनसेची लाट ओसरल्याने 2014 च्या निवडणुकीत किशोर शिंदे यांची चांगलीच पीछेहाट झाली होती. राष्ट्रवादीचे बाबूराव चांदेरे यांनी जोरदार प्रयत्न केला, पण मोदी लाटेत त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. कॉंग्रेसचे उमेदवार उमेश कंधारे यांना तुटपुंज्या मतांवर समाधान मानावे लागले होते.

आता आगामी विधानसभा निवडणूक कोणत्याच पक्षासाठी सरळ सोपी असणार नाही. गेल्या 4 वर्षांत अनेक राजकीय समीकरणे बदलली गेली आहेत. विद्यमान आमदार प्रा. मेधा कुलकर्णी नागरीप्रश्न, सहकारी सोसायट्यांच्या अडचणी सोडविण्यात पुढे दिसत असल्या तरी मतदार संघासाठी एखादा मोठा प्रकल्प आणण्यासाठी अपयशी ठरल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. चांदणी चौकातील होणाऱ्या दुमजली उड्डाणपुलाचे कामसुद्धा अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे येथील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न अद्याप कायम आहे. भाजपमधील इतर तुल्यबळ नेते उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे भाजपमध्येही उमेदवारीसाठी रस्सीखेच होणार हे नक्‍की आहे. त्यामुळे युती झाली तर, मतदारसंघ कोणाला सुटणार व युती नाही झाली तर, सेना व भाजपचा उमेदवार कोण असणार, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. या मतदार संघात भाजप आणि सेना यांच्यातच खरी लढत होणार आहे. कारण इतर पक्षांची स्थिती पाहता फारसा काही प्रभावी उमेदवार सध्या तरी त्यांच्याकडे दिसत नाही. उलट भाजप-सेनेमधील नाराज उमेदवारालाच पकडून तिकीट देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे दिसते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)