युतीची खिल्ली उडवणारी पुण्यातही फलकबाजी

सोशल मीडियावरही यथेच्छ खिल्ली : विरोधकांकडून नवीन “सोशल’ प्रचार

पुणे – सेना-भाजपची युती जाहीर झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर त्यांची यथेच्छ खिल्ली उडवण्याला सुरुवात केली आहेच; परंतु विरोधकांनी पुण्यात फलकबाजी करून युतीची खिल्ली उडवण्याला सुरुवात केली आहे. अशाप्रकारचा “सोशल’ प्रचार करून एकप्रकारे विरोधकांनी निवडणुकांच्या प्रचाराचा नारळच फोडला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजण्याआधी शिवसेना आणि भाजपने एकमेकांवर शरसंधान केले होते. राजीनामे खिशात घेऊन फिरत असल्याचे वक्तव्यही सेनेकडून सुरू होते. याशिवाय एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढून, सभांमध्येही यथेच्छ शाब्दिक धुलाईला सुरुवात केली होती. मात्र, निवडणुका काही दिवसांवर आल्या असताना आणि जागा वाटपाचा निर्णय करण्याची वेळ आली असताना सेना आणि भाजपने गळ्यात गळे घालून युती करत जागांचा फॉर्म्युलाही जाहीर केला. त्यावरूनच नेटकऱ्यांनी आणि विरोधकांनी त्यांना ट्रोल करण्याला आयती आलेली संधी अजिबात दवडली नाही.

‘ते म्हणाले- पटक देंगे, हे म्हणाले- झटक देंगे
ते म्हणाले – मस्ती, हे म्हणाले – कुस्ती
त्यांनी थोपटली मांडी, यांनी थोपटले दंड
देण्या-घेण्याचे ठरताच बंड झाले थंड
गळ्यात गळे घालत खोटे-खोटे हसू लागले
एकशे चव्रेचाळीसच्या बेरजेत फसू लागले’

अशा शाब्दिक व्यंगात्मक ओळी लिहून, त्याची फलकबाजी सुरू झाली आहे. इतकेच नव्हे तर त्याचे छायाचित्र काढून अनेकांनी फॉरवर्ड करण्यालाही सुरुवात केली आहे. यामध्ये मनसे कार्यकर्ते आघाडीवर असून, त्या खालोखाल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही असले मेसेजेस फॉरवर्ड करण्याला सुरुवात केली आहे.

याशिवाय “स्वबळावर प्रॉडक्‍शन, अशी ही “बनवा-बनवी’ भाग 2′ असे स्टिकर्सही व्हॉट्‌स अॅपच्या माध्यमातून पाठवले जात आहेत. “आनंदी-गोपाळ’ या चित्रपटाच्या पोस्टरचाही वापर यासाठी केला गेला असून, यामध्ये त्यांच्या चेहऱ्याच्या जागी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे चेहरे लावून त्याचाही प्रचार सोशल नेटवर्किंग साईटवर केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)