युतीचा मुख्यमंत्री कोण होणार ते सांगा! – एकनाथ खडसेंचे शिवसेनेला आव्हान

मुंबई (प्रतिनिधी) – जे काही घडायचंय ते घडलंय, ते मी आणि मुख्यमंत्री आमच्या दोघांतच आहे. पुढे काय करायचंय त्याबाबत माझं आणि मुख्यमंत्र्यांचं ठरलंय, असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले. मात्र, युतीचा मुख्यमंत्री कोण होणार ते सांगा, म्हणजे युतीत वादावादी होणार नाही, असे शिवसेनेला आव्हान देतानाच मुख्यमंत्री तसेच उद्धव ठाकरे सांगत नाही तोपर्यंत ते बाहेर येणार नाही. तेव्हा जे काही ठरलंय ते सांगा, असे आव्हान खडसे यांनी दिले.

विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड करण्यात आल्यानंतर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी उभे राहिलेल्या एकनाथ खडसे यांनी एकाच वेळी राधाकृष्ण विखे-पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. मुख्यमंत्री आणि माझं ठरलंय असे खडसे सांगत असतानाच अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आता ते उघड करू नका, असे म्हणाले. त्यावर शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी काय ठरलंय ते सांगा, अशी कोटी केली. तेव्हा तुमचं काय ठरलंय ते सांगा, युतीत मुख्यमंत्री कोणाचा होणार हे सांगून टाका, असे खडसे म्हणाले.

राधाकृष्ण विखे-पाटील हे भाग्यवान आहेत. विरोधी पक्षातून येऊन थेट तिसऱ्या स्थानावर बसले. कॅबिनेट मंत्री झाले. गिरीश महाजन आता आलेत. पहिल्यांदा सुधीर मुनगंटीवार हे निणराय प्रकियेत दिसायचे, आता ते दिसू लागले आहेत. सुधीर मुनगंटीवार तर थेट पाचव्या स्थानावर गेले आहेत, अशी खदखद व्यक्त करत खडसेंनी पक्षाला घरचा आहेर दिला.
विखे-पाटील यांनी विरोधी पक्षनेते म्हणून कामाचा ठसा उमटवला. पण अचानक त्यांनी राजीनामा का दिला? आणि सत्तेत का आले? ते कळलं नाही. आई म्हणते “बाळा गाऊ कशी अंगाई, तुझ्यामुळे झाले उत्तराई’, तसं आता वड्डेटीवारांना विखेंना म्हणावं लागेल “तुझा होऊ कसा उत्तराई’ अशा मिश्‍किल शैलीत खडसे यांनी वडेट्टीवारांचे अभिनंदन केले.

मी पक्षातच राहणार!
अर्धं आयुष्य विरोधी पक्षात गेले. विरोधी पक्षनेत्याचे गुण अजूनही बाहेर येत आहेत. त्यामुळे विसरून जातो की आता सत्ताधारी आहे. कधी-कधी आमच्या मंत्र्यांविषयीही बोलतो. पण त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी समजू नये की मी विखे-पाटलांची परंपरा सुरू ठेवीन. मी पक्षातच राहीन, असे खडसे यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.