“युटेक’ शेतकऱ्यांचे पैसे लवकरच देणार

रवींद्र बिरोले यांची माहिती; खात्यांची माहिती देण्याचे आवाहन
प्रभात वृत्तसेवा

नगर –संगमनेर तालुक्‍यातील “युटेक’ या कारखान्याला ऊस घालणाऱ्या फार थोड्या शेतकऱ्यांचे पैसे द्यायचे राहिले आहेत. शेतकऱ्यांनी त्यांच्या खात्यांची माहिती कारखान्याकडे द्यावी. 25 ते तीस तारखेच्या दरम्यान संबंधित खात्यांवर शेतकऱ्यांचे पैसे जमा केले जातील, अशी माहिती या कारखान्याचे अध्यक्ष रवींद्र बिरोले यांनी “प्रभात’ शी बोलताना दिली.
ते म्हणाले, की “युटेक’ चा गेल्या वर्षीचा हंगाम हा चाचणी हंगाम होता. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या उसाच्या नोंदणी व्यवस्थित घेतलेल्या नव्हत्या. शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांचा तपशील कारखान्यांकडे आलेला नव्हता. पहिलाच हंगाम असल्याने काही प्रमाणात वाहतूक व अन्य नोंदीत त्रुटी राहणे शक्‍य आहे. तरीही आता त्या दुरुस्त करण्यात आल्या आहेत. कारखान्याला एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ऊस घातलेल्या सर्वंच शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. दुसऱ्या आठवड्यानंतर झालेल्या गळितातील उसाचे पैसे द्यायचे राहिले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करू शकलो नाही. “युटेक’ ची साखर वादळात भिजली. कारखान्याच्या गोदामाचे शेड उडून गेले. त्यामुळे मोठे नुकसान झाले. भिजलेल्या साखरेच्या नुकसानीचे न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने पंचनामे केले. या कंपनीने साखरेचा लिलाव केला. त्याचे पैसे अजून कारखान्याला मिळालेले नाहीत. विमा कंपनीकडे पैसे मिळण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला. आता पैसे मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
नेवासे तालुक्‍यातील ज्या शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस दिला, त्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे दिलेले आहेत. फार थोड्या शेतकऱ्यांचे पैसे द्यायचे राहिले आहेत. आपण राजकारणी नाहीत. उद्योजक आहोत. शेतकऱ्यांच्या सहकार्याशिवाय कारखाना चालविता येणार नाही, याची आपल्याला जाणीव आहे; परंतु संपूर्ण साखर उद्योगच सध्या अडचणीतून जात आहे. त्याला “युटेक’ही अपवाद नाही. तरीही शेतकऱ्यांना आपण माणुसकीच्या भावनेतून मदत केली आहे. पुण्याच्या रुबी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या शेतकऱ्यांना मदत दिली आहे. काही शेतकऱ्यांची नावे यादीत नव्हती, तरीही त्यांना मदत करण्यास सांगितले आहे. न्यू इंडिया इन्शुरस कंपनीने पैसे द्यायची तयारी दाखविली आहे. तीन-चार कोटी रुपये मिळतील. ते मिळाले, की लगेचच शेतकऱ्यांच्या खात्यावर ते जमा करण्याची व्यवस्था केली जाईल. त्यासाठी कारखान्याच्या कार्यालयात किंवा नेवासे येथील गट कार्यालयात शेतकऱ्यांनी आपल्या बॅंक खात्याची माहिती द्यावी, असे आवाहन बिरोले यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)