युगांडा सर्वात ऊर्जावान तर कुवेत सर्वात सुस्त देश

जागतिक आरोग्य संघटनेची आळशी देशांची यादी जाहिर
जिनिव्हा – जागतिक आरोग्य संघटनेने 168 देशांमध्ये पाहणी केली असून कुठला देश सगळ्यात जास्त उत्साही व कार्यक्षम आहे आणि कुठला देश आळशी आहे याची वर्गवारी केली आहे. सगळ्यात जास्त शारीरिक कष्ट करणारा किंवा कामसू या निकषावर युगांडा या देशाने पहिले स्थान मिळवले आहे तर या यादीत तळाला म्हणजे सगळ्यात आळशी या स्थानावर कुवेत हा देश विराजमान झाला आहे.

व्यायाम ही दैनंदिन जीवनातील एक आवश्‍यक बाब आहे हे अद्यापही अनेकांना उमगलेले नाही. अर्थात याबाबत आता मोठ्या प्रमाणात जागृती झालेली आहे. जगभरातील देशांचा याबाबतीत विचार करता जगात युगांडा हा सर्वाधिक ऊर्जावान, सक्रिय देश असून कुवेत सर्वात सुस्त देश ठरला आहे. या यादीत भारत 117 व्या स्थानावर असून, ब्रिटन 123 आणि अमेरिका 143 व्या स्थानावर आहे! देशातील जनता पुरेसा व्यायाम करते का, या निकषावर आधारित ही पाहणी करण्यात आली होती.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार आठवड्यातून किमान 75 मिनिटे कडक व्यायाम किंवा 150 मिनिटांच्या धीम्या शारीरिक हालचाली करणे हा पुरेसा व्यायाम आहे. याबाबतीत युगांडाचे नागरिक सर्वात अव्वल आहेत. तेथील केवळ 5.5 टक्के लोक असे आहेत जे पुरेसा व्यायाम करीत नाहीत. 2001 ते 2016 या काळात ग्लोबल एक्‍सरसाईज लेव्हलमध्ये फारशी सुधारणा झालेली नाही. जागतिक आरोग्य संघटना येत्या सात वर्षांच्या काळात शारीरिक निष्क्रियताचा स्तर दहा टक्क्‌यांनी घटवू इच्छिते.

बहुतेक सगळ्या देशांमध्ये पुरूषांपेक्षा महिला कमी उत्साही किंवा कमी शारीरिक मेहनत करत असल्याचे आढळले आहे. गरीब देशांमध्ये जास्त शारीरिक कष्ट घेण्याचे प्रमाण जास्त उत्पन्न असलेल्या देशांपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे. कामाचं बैठं स्वरूप व वाहनांवर असलेलं कमालीचं अवलंबित्व यामुळे श्रीमंत देशांमधल्या नागरिकांचा शारीरिक व्यायाम कमी होत असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. गेल्या 15 वर्षांमध्ये शारीरिक व्यायामाच्या पातळ्यांमध्ये फारसा बदल झालेला नसल्याचंही यात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे बहुतेक सगळ्या देशांनी, लोकांनी व्यायाम करावा, शारीरिक कष्टांचं प्रमाण वाढवावं यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रबोधन करण्याची गरज जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)