नवी दिल्ली – युक्रेन नौदलाची तीन जहाजे रशियाने हल्ला करून ताब्यात घेतली आहेत. रशियाच्या या कृतीने क्रीमियायी द्वीपकल्पात तणाव निर्माण झाला असून राष्ट्रसंघाने या समस्येसाठी तातडीची बैठक बोलावली आहे. या प्रकरणात नाटो युक्रेनचे समर्थन करत आहे.
युक्रेनची जहाजे जप्त करण्याच्या आपल्या कृतीचे समर्थन करताना रशियाने म्हटले आहे, की युक्रेन नौदलाच्या जहाजांनी अवैधप्रकारे अजोव समुद्रातील आपल्या हद्दीत प्रवेश केला होता. याउलट आपण रशियाला याची पूर्वसूचना दिल्याचे युक्रेनचे म्हणणे आहे. या बाबतीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी चालू आहेत.
या भागात रशियाने लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्सची गस्त सुरू केली आहे. युक्रेनचे अध्यक्ष पेट्रो पोरोशेको यांनी रशियाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. रशियन जहाजांनी आपल्या जहाजांचा पाठलाग करून ती ताब्यात घेतल्याचे, आणि या कारवाईत युक्रेनचे सहा सैनिक जखमी झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. अजोव सागराची सीमा रशिया आणि युक्रेनमध्ये विभागलेली आहे. सन 2014 मध्ये रशियाने क्रीमियायी द्वीपकल्पावर कब्जा मिळवला. तेथे मोठ्या प्रमाणावर रशियन लष्कर तैनात आहे.
युक्रेनबाबतची “नाटो’ची तातडीची बैठक
या परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी “नाटो’च्या सदस्य देशांची एक तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.”नाटो’चे अध्यक्ष जेन्स स्टोल्टेनबर्ग यांनी युक्रेनचे अध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर युक्रेनच्या अधिकाऱ्यांबरोबर “नाटो’ पदाधिकाऱ्यांची चर्चा होण्याचे निश्चित झाले आहे. “नाटो’च्या सरचिटणीसांनी युक्रेनला आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार सागरी हद्दीच्या सार्वभौमत्वाबाबत आणि पूर्ण पाठिंबा देऊ केला आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा