या प्रश्‍नांना उत्तर नाही

मधुसूदन पतकी

पाणी,रस्ते आणि वीज या सामाजिक जीवनातल्या महत्वाच्या गरजा.समाज स्वस्थ ,सुरळीत आणि चिंतामुक्त रहायचा असेल तर या तीन मुलभूत सामाजिक सेवांकडे शासनाने जाणिवपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे.आज वर्षांनुवर्षे या तीन मुद्यांवर निवडणूक लढवली जात आहे.विरोधक पाणी,वीज,रस्ते कसे नाहीत.त्यावर किती खर्च होतो,तो नेमका कुठे जातो याचा जाब सत्तारूढ पक्षाला विचारतो तर सत्तारुढ पक्ष कायमस्वरुपी या सेवा आम्ही किती योग्य पध्दतीने देतो याची बढाचढाके माहिती देत असतो.पक्षांचे काही होवो याचा त्रास आणि भोगणे सर्वसामान्यांच्या कपाळी असते.सर्वसामान्य कुरकुर करत आणि सहनशीलतेने ते मान्य ही करत असतात.पावसाळ्याच्या दिवसात पाणी,रस्ते आणि वीज या तिन्हींचा घोळ नेहमी होत असतो.पाणी गढुळ आणि पिण्यायोग्य नसते ,ते गाळून,उकळूून,औषधे घालून पिण्याचे आवाहन स्थानिक स्वराज्य संस्था करत असतात.एकतर पाणी पिण्यायोग्य नसणे हा प्रकार घडत असताना अनेकदा पावसामुळे वीज गायब होते आणि उपसा न झाल्याने पाणी पुरवठा खंडीत होत असतो.गाळ साठतो आणि वाहिन्या बंद पडतात.सकाळी सकाळी पाणी न आल्याने गृहलक्ष्मीच्या पाणी न आल्याचे त्राग्याने दिवसाची सुरवात तासप्तकातील युगुलगिताने होते.पाण्या पाठोपाठ प्रश्‍न निर्माण होतो तो वीजेचा ! आपल्या राज्यात पावसाळ्याच्या प्रारंभी आणि समेवर पाऊस पडायला लागला तरी प्रथम परिणाम होतो तो वीजेवर.वीज वितरण कंपनी नेमकी आपल्याला पाहिजे त्यावेळी वीज घालवत असते.उन्हाळ्यात धरणांमध्ये पाणी नसल्याने वीज कपातीचे संकट कायम पाचवीला पुजलेले असते तर पावसाळ्यात वृक्षांची पडझड , वीजेच्या तारा तुटल्यानी खंडीत होणारा वीज पुरवठा,दुरुस्तीसाठी आणि देखभालीसाठी वीज बंद केली जाते.थोडक्‍यात ग्रामीण भागात उन्हाळा आणि पावसाळा या दोन्ही हंगामात वीजेच्या नावाने शंखच असतो.त्या पुढे जाऊन महत्वाची आणि अत्यावश्‍यक सेवा असते ती दळणवळासाठी आवश्‍यक रस्त्यांची.शहरातले रस्ते वाहून जातात तर ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था भयावह असते.शहरात रस्ते पाण्याने वाहून गेल्याने पडलेल्या मोठमोठ्या खड्यांमध्ये वाहने ,पादचारी पडतात.अनेक अपघात होतात.पावसातच रस्त्यांची किरकोळ डागडुजी ही होते.पण पावसाचा जोर असेल तर ही मलमपट्टी यत्‌किंचित उपयोगाची नसते.पण नगर पालिकांना खड्डे बुजवल्याचे पुण्य पदरी पडल्याचे समाधान मानुन घेत असते.ही सगळी परिस्थीती पाहिली तर वर्षानुवर्षे शासकीय यंत्रणा काय करतात असा प्रश्‍न निर्माण होत असतो.मे महिन्याच्या पंधरा तारखे नंतर रस्ते दुरुस्त करणे , नवे रस्ते तयार करणे थांबवले जाते.याचा अर्थ पंधरा मे पूर्वी रस्ते दुरुस्त केले पाहिजेत.गटारे,नाले साफ केले पाहिजेत.हे नियम तोंड देखले पाळले जातात.मुंबईसारख्या महापालीकेत ही नाले आणि रस्त्यावरून रणकंदन होते त्यामूळे सातारा सारख्या शहरांची काय अवस्था होत असेल याची कल्पनाही केली नाही तरी चालेल.आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज करण्याचे ही आदेश दिले जातात मात्र या यंत्रणा आपत्ती आल्या शिवाय किती सज्ज आहेत हे समजत नाहीत.थोडक्‍यात माहिती असलेली संकटे आणि सेवा खंडीत ,विस्कळीत होणार आहेत हे माहिती असताना वर्षानुवर्षे ही सेवा देणाऱ्या संस्था तत्पर कधी आणि कशा होणार हा पण प्रश्‍नच आहे.आणि या प्रश्‍नाचे उत्तर कोणत्याच गाईडमध्ये नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)