या आगीने तरी डोळे उघडतील का ?

पिंपरी – डोंगराला आग लागली पळा…पळा… पळा हा लहानपणीचा खेळ पिंपरी-चिंचवड शहराचा अग्निशामक विभाग रोज अनुभवतो आहे. मोशी येथील कचरा डेपोमधील कचऱ्याच्या एका विशालकाय डोंगराला आग लागली आणि कित्येक तास अग्निशामक दलाच्या जवानांनी झुंज दिली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी वीस तासाहून अधिक काळ अग्निशामक दलाचे जवान सतत ही आग आटोक्‍यात आणण्याचे प्रयत्न करत राहिले. गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही आग लागली असून शुक्रवारी दुपारपर्यंत 60 ते 65 टॅंकर पाण्याचा मारा करुन ही आग आटोक्‍यात येत नव्हती. या आगीने महापालिका प्रशासन आणि सरकारच्या दिरंगाईला उघडे पाडले. आग लागण्याच्या कारणापासून ते आग विझविण्याच्या प्रक्रियेपर्यंत कित्येक प्रशासनाच्या कित्येक त्रुटी या आगीच्या झळांनी अक्षरशः उघड्या पाडल्या.

का लागली आग?
मोशी येथील कचरा डेपोला गुरुवारी रात्री लागलेल्या आगीने क्षणार्धातच भीषण रुप धारण केले. आग आणि धुराचे लोट कित्येक किलोमीटरवरुन दिसू लागले. जिथे सरकार आणि प्रशासन वेस्ट एनर्जी प्रकल्प करण्याची स्वप्ने पाहत होते तिथे अग्नितांडव सुरु होता. आगीच्या कारणांची अद्याप स्पष्टता आणि पुष्टी झाली नाही, परंतु प्राथमिक अंदाजानुसार ही आग मानवीय त्रुटीमुळे लागली असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार या आगीसाठी बिडी-सिगारेटचे व्यसन ही कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.

आग आटोक्‍यात का नाही?
तब्बल वीस तासांनंतरही आग आटोक्‍यात का येत नाही? असा प्रश्‍न नागरिकांना नक्‍कीच सतावत आहे. आग खूपच भीषण आहे. एकूण 85 एकरमधील कचरा डेपो पैकी तीन ते चार एकरमध्ये एक कचऱ्याचा विशालकाय डोंगर आहे, त्याला ही आग लागली आहे. तीन ते चार एकरच्या कचऱ्याच्या डोंगराला लागलेली आग विझवणे इतकेही सोपे नाही. सर्वांत मुख्य बाब म्हणजे ज्या डोंगराला आग लागली आहे, तो कागद, रबर, प्लास्टिक अशा सहज पेटणाऱ्या पदार्थांनी ठासून भरला आहे. रबराचे टायर, ट्युब व रबराच्या इतर वस्तुंचे ही प्रमाण खूप अधिक असल्याने काळा धूर बाहेर पडत आहे. आगी आटोक्‍यात येत असल्याचे वाटत असतानाच अचानक रबरामुळे भडका उडत आहे. अग्निशमन दलाच्या जवानांच्या धैर्याची आणि कौशल्याची ही आग जणू काही कठीण परीक्षा घेत आहे.

अशी दिरंगाई का?
सहा वर्षांपूर्वी मोशी येथील कचरा डेपोमध्ये एक मोठी आग लागली होती. त्यानंतर अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी विशेष नियोजन करण्यात आले. तरीदेखील लहान-लहान आगीच्या घटना येथे होतच राहिल्या, परंतु गुरुवारी लागलेली आग आतापर्यंतची सर्वांत मोठी घटना ठरली. आग लागू नये यासाठी सहा वर्षांपूर्वी ठरलेल्या नियोजनात केलेली दिरंगाई महागात पडत असल्याचे सध्या तरी दिसत आहे. कचऱ्याचा ढीग तयार झाला की त्याला मातीने दाबायचे अशा प्रकारचे हे नियोजन होते. हे नियोजन कमी पडले. जिथे-जिथे कचरा मातीने दाबला आहे तिथे आग फोफावत नसल्याचे दिसून आले आहे. परंतु जिथे मातीने दाबण्यात दिरंगाई करण्यात आली तिथे अर्थात त्या तीन ते चार एकरात पसरलेल्या मोठ्या डोंगरात आगीची भडाका उडाला आहे.

महापालिकेचे स्पष्टीकरण
सहा ते सात वर्षापासूनचा कचरा त्यामधून वाढत्या तापमानामुळे तसेच गुरुवारी सायंकाळी सहानंतर मोठ्या प्रमाणात वारे असल्यामुळे आग लागली असल्याची शक्‍यता आहे. कचऱ्याचे ढिगाऱ्यामधून खालून मिथेन वायू बाहेर येत असल्याने व सदरचा वायू ज्वलनशील असल्याने आग नियंत्रणामध्ये येण्यास मर्यादा येत आहे. सदरची आग लागल्याने व वारे पश्‍चिमेकडून पूर्वेकडे वाहत असल्याने चऱ्होलीच्या बाजूस मोठ्या प्रमाणात धूर पसरला आहे. जळणाऱ्या भागावर माती व पाणी पसरण्याचे काम प्रगती पथावर आहे. वाढता उन्हाळा व त्यामुळे वाढते तापमान लक्षात घेऊन यापुढे अशा आगी लागू नयेत यासाठी आवश्‍यक दक्षता व खबरदारी महापालिकेकडून घेण्यात येत असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)