यावर्षीही 17 शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर

महापालिका शिक्षण विभाग : मागील वर्षीच्या 7 शाळांचा समावेश

15 जूननंतर सुरू झालेल्या शाळांना 1 लाख रूपये दंड

पुणे – महापालिकेच्या शिक्षण विभागाने मागील वर्षी 29 तर, या वर्षी 17 शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, यातील 7 शाळा मागील वर्षीही अनाधिकृत होत्या. तसेच यावर्षीदेखील अनाधिकृत शाळांच्या यादीत आहेत. त्यामुळे या शाळांना आता पालिकेकडूनच अभय मिळते आहे का, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

राज्यस्तरावरील सरकारी परवानगी, ना हरकत प्रमाणपत्र न घेता राज्यमंडळ तसेच अन्य शिक्षण मंडळाच्या शाळा सुरू असतात. दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यानुसार ही यादी त्या-त्या स्थानिक पातळीवर जाहीर करणे गरजेचे आहे. याबाबत राज्य शासनाकडून वेळोवेळी सूचना येतात, तरीही याबाबत प्रभावी अंमलबजावणी मात्र होत नाही. मागील वर्षी पालिकेने ज्या 29 शाळांची यादी जाहीर केली होती. त्यातील 7 शाळा यंदाच्या वर्षीदेखील अनधिकृतच्या यादीत आहेत. यामध्ये रोझरी स्कूल, महात्मा गांधी इंटरनॅशनल स्कूल, इ कोल हेरिटेज स्कूल, द होली मिशन इंग्लिश मिडियम स्कूल, न्यू होरिझोन स्कूल, दर ए अर्कन उर्दू स्कूल व ज्ञानप्रबोधिनी शाळेचा समावेश आहे.

दरम्यान ही अनधिकृत शाळांची यादी शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा सुरू होण्यापूर्वी जाहीर करणे अपेक्षित असताना यंदा ही यादी सर्व शाळांमध्ये प्रवेश झाल्यानंतर सुरू झाली. त्यामुळे अर्थातच आता विद्यार्थ्यांचे कारण पुढे करत या शाळा सुरू ठेवल्या जातील, असे निदर्शनास येते आहे. दरम्यान या शाळांकडून किती दंड वसूल केला, याचीही ठोस माहिती जाहीर नसल्याने सर्वत्र अनधिकृत शाळांचा अनागोंदी कारभार चालत असल्याचे समोर येते आहे.

नियम काय सांगतात?
शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 18 नुसार शासन अथवा स्थानिक प्रशासनाच्या परवानगी अथवा मान्यतेशिवाय सुरू असणाऱ्या शाळांवर कारवाई करणे आवश्‍यक आहे. 15 जूननंतर या शाळा सुरू राहिल्यास अनधिकृत शाळेच्या व्यवस्थापनास 1 लाख रूपये दंड व जोपर्यंत शाळा बंद होत नाही, तोपर्यंत प्रतिदिन 10 हजार रूपये दंडाची तरतूद आहे.

काही अनधिकृत शाळांच्या मान्यतेच्या प्रक्रिया सुरू असल्यामुळे त्या मागील वर्षी आणि या वर्षीही अनधिकृत शाळांमध्ये दिसत आहेत. या शाळांकडून किती दंड वसूल केला, हे आत्ताच सांगता येणे कठीण आहे. परंतु दंडात्मक कारवाई होत असते.
-शिवाजी दौंडकर, प्रभारी शिक्षणप्रमुख, महापालिका शिक्षण विभाग


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)