कराड – मलकापूर नगरपालिकेच्या मतदार यादी संदर्भात माजी सत्ताधाऱ्यांकडून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. मतदार याद्या दुरुस्त झाल्याशिवाय निवडणूक होऊ देणार नाही. त्यासाठी न्यायालयात जावे लागले तरी चालेल, असा इशारा शेती मित्र अशोकराव थोरात यांनी दिला.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. थोरात म्हणाले, ऑनलाईन नोंदविण्यात आलेल्या हरकतींबाबत चुकीची आकडेवारी माजी सत्ताधाऱ्यांकडून लोकांसमोर मांडली जात आहे. खरी आकडा 563 नसून 439 आहे. मतदार याद्यांमध्ये अनेक व्यक्तींची नावे दोन ठिकाणी नोंद आहेत. मनोहर शिंदे यांच्या घर क्र. 155 वर नोंदविलेले मतदार आणि यादव आर्केड पत्त्यावर नोंदविलेल्या मतदारांची संपूर्ण चौकशी सुनावणी आणि प्रत्यक्ष भेटी देऊन झाली पाहिजे. बोगस मते नोंदविली असल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई व्हावी.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या राजकारणात अनेक पदे भूषवली आहेत. त्यामुळे हवेत गोळ्या न झाडता त्यांनी माहिती घेऊनच बोलावे. त्याच वेळी अशा बोगस मतदार याद्या तुम्ही रद्द का केल्या नाहीत? तुम्ही तुमच्या कर्तव्यात हलगर्जीपणा का केला? त्यामुळे मतदार याद्या दुरुस्त झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत मलकापूर नगरपरिषदेची निवडणूक होऊ देणार नाही. प्रसंगी न्यायालयात जाणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा