#यादों की बारात “रेनकोट’ मधून त्यागाचा आशयपूर्ण संदेश (भाग-१)

अश्‍विनी धायगुडे-कोळेकर 
चित्रपट हा प्रत्येकाचा आवडता विषय. काही चित्रपट मनावर कायमचं अधिराज्य गाजवितात. अभिनय, चित्रण, संगीत, गाणी अशा वेगवेगळ्या अंगांनी चित्रपट लक्षात राहतात. अशा गाजलेल्या जुन्या चित्रपटांच्या आठवणीचा धांडोळा दर आठवड्याला वाचकांच्या भेटीला…नव्या सदरातून…
मनोरंजन हा नेहमीच कोणत्याही सिनेमाचा मुख्य हेतू असतो. हा हेतू डोळ्यासमोर ठेवूनच सिनेमे तयार केले जातात. त्यामुळं सगळ्यात जास्त मनोरंजन करणारा “प्रेम’ हा अजरामर फॅक्‍टर सिनेमा बनविणाऱ्यांसाठी अत्यंत लाडका आहे! तसं पाहता प्रेम ही भावना मानवासाठी वरदान आहे. त्याहूनही सिनेसृष्टीसाठी तर संजीवनीच आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. प्रेमाच्या सर्व पैलूंना सिनेमांद्वारे प्रकाशात आणण्याचा प्रयत्न प्रत्येक दिग्दर्शक करीत असतो. काहींचे प्रयत्न तोकडे पडतात, तर काहींचे प्रयत्न इतरांसाठी दिशादर्शक बनतात.
काही सिनेमे प्रेमाची उदात्त संकल्पना पडद्यावर साकारतात, काही प्रेमभंगाचं दुःख दाखवितात, तर काही सिनेमे त्यातून कसं सावरायचं हे दाखवितात. लैला-मजनू, हीर-रांझा, रोमिओ-ज्युलिएटपासून ते अगदी कृष्ण- राधेपर्यंतच्या सर्व प्रेमकथांना पडद्यावर स्थान मिळालं आहे. खरंतर या प्रेमकथांना पडद्यावर साकारणं हे अत्यंत धाडसाचं आणि जिकिरीचं काम आहे. याचं जितकं श्रेय दिग्दर्शकाला जातं, तितकंच किंबहुना त्याहून अधिक श्रेय कथाकाराला जातं. कारण या प्रकारच्या सिनेमामंध्ये कथा दमदार असेल, तरच तो सिनेमा लोकांना अपील होऊ शकतो.
असाच एक सिनेमा 2004 साली प्रदर्शित झाला. जो एक नितांत सुंदर प्रेमकथा आणि विरह कथादेखील म्हणता येईल असा होता. अडनिड्या वयातल्या निरागस प्रेमापासून ते प्रगल्भ प्रेमापर्यंतचा हा प्रवास ऋतुपर्णो घोष या दिग्दर्शकानं अप्रतिमरीत्या पडद्यावर चितारला होता. या सिनेमाला अनेक पारितोषिकं मिळाली. ज्यात राष्ट्रीय पुरस्कारदेखील होता आणि तो सिनेमा होता, अजय देवगण व ऐश्‍वर्या रॉय अभिनित “रेनकोट.’
या सिनेमाची कथा सुरू होते ती मन्नू (अजय देवगण) च्या बेरोजगारीपासून. मन्नूला त्याचा नवीन बिझनेस सुरू करायचा आहे. त्यासाठी मित्रांची मदत घ्यायची, म्हणून तो त्याचं गाव सोडून कोलकत्ता शहरात येण्याचा विचार करीत असतो. याच शहरामध्ये त्याची पूर्व प्रेयसी निरू (ऐश्‍वर्या रॉय) लग्नानंतर राहात असते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)