#यादों की बारात “रेनकोट’ मधून त्यागाचा आशयपूर्ण संदेश (भाग-३)

अश्‍विनी धायगुडे-कोळेकर 
चित्रपट हा प्रत्येकाचा आवडता विषय. काही चित्रपट मनावर कायमचं अधिराज्य गाजवितात. अभिनय, चित्रण, संगीत, गाणी अशा वेगवेगळ्या अंगांनी चित्रपट लक्षात राहतात. अशा गाजलेल्या जुन्या चित्रपटांच्या आठवणीचा धांडोळा दर आठवड्याला वाचकांच्या भेटीला…नव्या सदरातून…
दोन जुने प्रियकर प्रेयसी भेटल्यानंतर होणारी त्यांची घालमेल, तुला सोडल्यानंतर माझं काहीच वाईट झालं नाही. उलट, सगळं किती छान आणि सुंदर सुरू आहे, हे दाखविण्याचा दोघांचाही अट्टहास आणि आहे ती परिस्थिती अगदी बेमालूमपणे एकमेकांपासून लपवताना होणारी दमछाक अजय आणि ऐश्‍वर्यानं इतक्‍या सुंदर पद्धतीनं साकारली आहे की बास! मुळातच अजय हा कमी बोलणारा अभिनेता; मात्र त्याच्या बोलक्‍या डोळ्यांमुळं त्याचा अभिनय अत्यंत बोलका झालेला आहे. ऐश्‍वर्यानं मात्र खरंच या पात्रात जीव ओतला आहे. तिचा अभिनय तिच्या इतकाच सुंदर आहे. तिनं साकारलेलं निरूचं पात्र कदाचित तिच्याऐवजी इतर कुणीही इतक्‍या दमदारपणे साकारू शकलं नसतं.
सिनेमातील सर्वंच गाणी अत्यंत श्रवणीय आहेत. देबज्योती मिश्रा यांनी या सिनेमात संगीताचा वेगळाच प्रयोग केला आहे. यातील सर्वंच गाणी ही “बॅकग्राऊंड’ ला वाजतात. त्यातील “मथुरा नागरापती’ हे शुभा मुद्‌गल यांच्या आवाजातील गाणं तर स्वर्गसुख देणारं आहे. देबज्योतीच्या संगीतासोबतच पावसाचा नितांत सुंदर वापर या सिनेमात केला गेला आहे! सिनेमाच्या नावाला अगदी साजेशी वातावरणनिर्मिती या पावसानं केली आहे!
दिग्दर्शकानं रेनकोट हे प्रतीक म्हणून वापरलं असावं. कारण त्या वेळी तिथं बरसणारा तो पाऊस म्हणजे जणू काही त्या दोघांची वाताहत झालेली आयुष्यचं आहेत. एकामागून एक सारखी बरसणारी संकटं आणि मित्राच्या घरातील नोकराचा तो “रेनकोट’. त्याची ती काय ऐपत असणार? तो रेनकोट त्याच्या कुवतीप्रमाणे थोड्या वेळेसाठी का होईना त्या दोघांचाही पावसापासून बचाव करतोय!
या सिनेमातील अगदी शेवटचा म्हणावा तसा “सीन’ ज्यात निरूची परिस्थिती कळल्यामुळं उद्विग्न झालेला मनू बाथरूममध्ये जाऊन रडतो. मित्राची बायको त्याला बाहेर बोलावताना तिला आंघोळीचं कारण देतो. ती तरीही बाहेर बोलावते, तेव्हा त्याचे रडून सुजलेले डोळे आणि त्याची होणारी प्रचंड घालमेल अजयनं इतकी अफलातून साकारलीय की अगदी जीव ओवाळून टाकावा. खऱ्या प्रेमाचा, त्यातील व्याकुळतेचा आणि हिरावून घेण्याऐवजी देण्यातच खरं प्रेम आहे असा साधा; पण आशयपूर्ण संदेश देणारा सिनेमा एकदा तरी पाहायलाच हवा.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)