#यादों की बारात “रेनकोट’ मधून त्यागाचा आशयपूर्ण संदेश (भाग-२)

अश्‍विनी धायगुडे-कोळेकर 
चित्रपट हा प्रत्येकाचा आवडता विषय. काही चित्रपट मनावर कायमचं अधिराज्य गाजवितात. अभिनय, चित्रण, संगीत, गाणी अशा वेगवेगळ्या अंगांनी चित्रपट लक्षात राहतात. अशा गाजलेल्या जुन्या चित्रपटांच्या आठवणीचा धांडोळा दर आठवड्याला वाचकांच्या भेटीला…नव्या सदरातून…
निरू आणि मन्नूचं एकमेकांवर नितांत प्रेम असतं; पण दुनियादारी व पैशांपुढं निरू मन्नूला सोडून एका श्रीमंत माणसासोबत लग्न करते आणि कोलकात्याला निघून जाते. मन्नू जेव्हा त्याच्या पडत्या काळात कोलकात्याला मित्रांना भेटायला जायला निघतो, त्याच वेळी त्याची आई त्याला निरूकडं न जाण्याचा सल्ला देते. मन्नू इकडं कोलकात्याला त्याचा मित्र अलोक (समीर धर्माधिकारी ) कडं पोहोचतो. अलोक आणि त्याची पत्नी (मौली गांगुली) दोघंही त्याला मदत करतात. त्याचे इतर मित्रही त्याला पैसे देतात; पण त्याच्या मनात मात्र निरूला भेटायची अनिवार ओढ असते.
शेवटी तिच्या पत्त्यावर तो पोहोचतो. जी निरू लग्न होऊन गेली ती आणि आताची निरू यात खूप फरक आहे हे मन्नूला जाणवतं. दोघांचीही परिस्थिती अत्यंत वाईट व दयनीय असतानाही दोघं एकमेकांसमोर अगदी मजेत असल्याचा आव आणतात. आपण अगदी छान राहात असल्याचं, घर, बंगला, गाडी असल्याचं एकमेकांना भासवतात.
शेवटी निरू त्याच्यासाठी काहीतरी खायला आणायचं, म्हणून मन्नूचाच रेनकोट घालून घराबाहेर पडते. एरवी दारावर कोणीही आलं, तरी दार न उघडणाऱ्या निरूच्या घराचे दारे व खिडक्‍या मन्नू उघडतो. इकडं नेमक्‍या त्याच वेळेत निरूचा घरमालक (अन्नू कपूर )तिथं येतो आणि निरूची सत्य स्थिती त्याला सांगतो. शेवटी मन्नू त्याला मित्रांनी बिझनेससाठी दिलेले पैसे त्या घरमालकाला देतो आणि निरूला घराबाहेर हाकलून देऊ नकोस अशी विनवणी त्याला करतो. घरमालक बाकीचे पैसेही लवकरच मिळतील, अशी कबुली घेऊनच घर सोडतो. निरू यायच्या आतच मन्नूला तिची परिस्थिती कळली असल्याचं एका पत्रात लिहितो आणि ते पत्र तिच्या बेडखाली ठेवतो.
दोघं एकमेकांचा निरोप घेतात. इकडं मन्नू अलोकच्या पत्नीस सगळी हकीकत सांगतो. अलोक मात्र झाल्या प्रकारानं अत्यंत चिडतो. आता काय, या विवंचनेत रात्री झोपलेला असताना अलोकची बायको मन्नूला तो जो रेनकोट तो घालून गेलाय त्यात काही सापडल्याचं सांगते. त्यात एक चिठ्ठी असते जी मन्नूनं त्याच्या मित्रांकडं मदत मागण्यासाठी लिहिलेली असते. ती वाचून निरूला मन्नूची खरी परिस्थिती कळते. ती स्वतःच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि बांगड्या त्या रेनकोटच्या खिशात ठेवते आणि त्या पत्राखाली लिहिते, की माझा नवरा आता इथं नाही. अन्यथा, तुला किमान 50 हजार रुपये त्यानं सहजच दिले असते. तू माझा जुना मित्र आहेस, त्यामुळं मी तुला सध्या इतकीच मदत करू शकते. मन्नू ते पत्र वाचतो आणि सिनेमा संपतो.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)