… याचाही जन्माला येणाऱ्या बाळावर होतो परिणाम

आईच्या अनेक गोष्टींचा जन्माला येणाऱ्या बाळावर परिणाम होत असतो. आर्थिकदृष्टया कमकुवत असणाऱ्या गर्भवती महिला येणाऱ्या बाळाच्या आगमनाची काळजी करत बसतात. मात्र त्यामुळे लहान अथवा वैद्यकीयदृष्टया असुरक्षित, कमकुवत मुले जन्माला येऊ शकतात, असे एका अभ्यासात आढळले आहे. त्यामुळे गर्भवती महिलांनी आर्थिक स्थितीचा ताण घेऊ नये, असा सल्ला संशोधकांनी दिला आहे.

अमेरिकेच्या ओहायो स्टेट विद्यापीठातील संशोधकांनी सुमारे 138 गर्भवती महिलांचा अभ्यास केला. या वेळी त्यांना देण्यात आलेल्या प्रश्नावलीत आर्थिक ताण, उदासीनतेची लक्षणे, गर्भधारणेतील विशिष्ट त्रास, समजून आलेला ताण आणि सामान्य चिंता याबाबतच्या प्रश्नांचा समावेश करण्यात आला होता. या गर्भवतींचे वय 29 वर्षांच्या दरम्यान होते. तसेच त्या पाच ते 31 आठवडयांच्या गर्भवती होत्या. सहभागी झालेल्या गर्भवती महिलांनी बाळांना जन्म दिल्यानंतर संशोधकांनी त्यांच्या वैद्यकीय नोंदी आणि प्रश्नावली यांचा अभ्यास केला. यानंतर ही माहिती समोर आली आहे. आर्थिकदृष्टया कमकुवत असणाऱ्या गर्भवती महिला जन्माला येणाऱ्या बाळाच्या आगमनाची तसेच त्याच्या भविष्याबाबत काळजी करत बसतात. त्यामुळे बाळ लहान आणि वैद्यकीयदृष्टया असुरक्षित, कमकुवत जन्माला येण्याची शक्‍यता निर्माण होते, असे संशोधकांना अभ्यासात आढळून आले. सामाजिक आर्थिक स्थिती खराब असण्याचा घटक गर्भवतींवर परिणाम करतो. त्यामुळे जन्माला येणाऱ्या बाळामध्ये गुंतागुंत वाढून त्याचा मृत्यू होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असे ओहायो स्टेट विद्यापीठातील संशोधक अमांडा मिशेल यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)