‘यांच्या’ कुटील राजकारणामुळे संविधान धोक्‍यात

गुलाबनबी आझाद : पश्‍चिम महाराष्ट्रातील “जनसंघर्ष यात्रेचा’ समारोप

पुणे – स्वातंत्र्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या रुपाने देशाला सर्वांत कुचकामी असा पंतप्रधान लाभला आहे. मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कुटील राजकारणामुळे देशाच नव्हे तर देशातील लोकशाही तसेच संविधानही धोक्‍यात आले आहे. याला भाजपचे फसवे राजकारणच कारणीभूत असून त्याचा त्रास देशातील जनतेला होत आहे, असा घणाघाती आरोप राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाबनबी आझाद यांनी केला.

स्वातंत्र्यपूर्व काळात देशाला परकीयांपासून धोका होता. त्यावेळी कॉंग्रेसच्या नेत्यांनी लढा देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आता परकीयांपासून नव्हे तर स्वकीयांपासूनच देशाची लोकशाहीच धोक्‍यात आली आहे. मात्र, कॉंग्रेसचा सर्वसामान्य कार्यकर्ता संघर्ष करून देशाला भाजपपासून स्वातंत्र्य मिळवून देईलच असा निर्धारही त्यांनी केला.

केंद्र आणि राज्य शासनाच्या विरोधात कॉंग्रेसच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या पश्‍चिम महाराष्ट्रातील “जनसंघर्ष यात्रेचा’ समारोप शनिवारी पुण्यात झाला. त्यावेळी बोलताना आझाद यांनी हा हल्लाबोल केला. महाराष्ट्राचे प्रभारी आणि लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ. विश्‍वजित कदम, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चारुताई टोकस, शहराध्यक्ष रमेश बागवे, जिल्हाध्यक्ष संजय जगताप आणि आजी माजी आमदार यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

काळा पैसा बाहेर काढण्याच्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्थाच मोडीत काढली असून त्यांच्या या हिटलरशाही कारभारामुळे देशातील पाचशे नागरिकांना जीव गमवावा लागला आहे, असा आरोप करून आझाद म्हणाले; स्वातंत्र्यपूर्व काळात गोळी आणि लाठीच्या बळावर सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले जात होते. मात्र, भाजप सरकारच्या काळात इन्कमटॅक्‍स आणि सीबीआयच्या माध्यमातून विरोधक आणि सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले जात आहे.

या माध्यमातूनच सरकारची हुकूमशाही सुरू आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कॉंग्रेसच्या नेत्यांनीच लढा दिला. त्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळू शकले. आता मात्र भाजपच्या कुटील राजकारणामुळे देशालाच नव्हे तर देशातील लोकशाही आणि संविधानालाही धोका निर्माण झाला आहे. हे वास्तव असले तरी लढा देण्याची शिकवण कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना फार पूर्वीपासून दिली आहे. त्यामुळे या शिकवणीच्या बळावरच सर्वसामान्य कार्यकर्ता देशाला भाजपमुक्त केल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धारही आझाद यांनी व्यक्त केला.

भाजप सरकारच्या काळात देश बरबादीच्या दिशेने वाटचाल करत आहे, असा आरोप करून महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, कच्च्या तेलाच्या किंमती कमी असतानाही केंद्र शासनाने सर्वसामान्य नागरिकांवर सातत्याने इंधनाची दरवाढ लादली आहे. या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. पाशवी बळाच्या माध्यमातून भाजप दररोज घोटाळे करत असून या घोटाळेबाजांनी देशाला लुटण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, लोकशाहीवर गदा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप सरकारला आणि त्यांच्या नेत्यांना सर्वसामान्य जनता कदापीही माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

भाजपकडून दहशतवादाला खतपाणी घालण्याचे काम सुरू
आघाडी सरकारच्या काळात जम्मु-काश्‍मीरमधील दहशतवाद संपविण्याचे काम करण्यास प्राधान्य देण्यात आले. त्यामुळेच तेथील जनता सुरक्षित राहिली. मात्र, देशात भाजपची सत्ता आल्यानंतर सर्वाधिक दहशतवाद फोफावला गेला. हा दहशतवाद संपविण्याचे काम करण्याच्या ऐवजी स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी या दहशतवादाला खतपाणी घालण्याचे कामच भाजपच्या सरकारने केले आहे, असे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाबनबी आझाद म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)