यशवंत सिन्हा यांनी स्थापन केला “राष्ट्र मंच’

भाजपामधील प्रत्येक जण आज भीतीच्या सावटाखाली वावरतो आहे. मात्र आम्हाला भय नाही. देशातील संवाद आणि वाद करणे आज असभ्यपणा समजला जातो आहे. हा एकतर्फी संवाद धोकादायक आहे. न्यायदान हे जमावाचे काम आहे, असे वाटू लागले आहे.

– यशवंत सिन्हा
भाजपाचे ज्येष्ठ नेते, “राष्ट्र मंच’चे संस्थापक

शत्रुघ्न सिन्हाही झाले सामील; भाजपचा विरोध नसल्याचे केले स्पष्ट

नवी दिल्ली – स्वतःच्याच भाजपावर वारंवार शरसंधान करणाऱ्या यशवंत सिन्हा यांनी आज “राष्ट्रय मंच’ या नावाने एका स्वतंत्र राजकीय संघटनेची घोषणा केली. भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह अनेक राजकीय नेते यामध्ये सहभागी झाले आहेत. केंद्र सरकारच्या धोरणांना विरोध करणे हा एकमेव कार्यक्रम या नव्या मंचाद्वारे राबवला जाणार असल्याचे यशवंत सिन्हा यांनी सांगितले.

-Ads-

“ज्याप्रमाणे 70 वर्षांपूर्वी याच दिवशी महात्मा गांधी यांची हत्या झाली होती. त्याच प्रमाणे आज लोकशाही आणि लोकशाहीवादी संस्थांवरही हल्ले होत आहेत. नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांना भिकारी केले आहे. आपले हित जपण्यासाठी सोयीच्या आकडेवारीने शेतकऱ्यांना गणले जाते आहे.’ अशी टीका यशवंत सिन्हा यांनी यावेळी केली.
“राष्ट्र मंच’ही संघटना बिगर पक्षीय राजकीय कृती गट असणार आहे. कोणत्याही पक्षाला विरोध करण्यासाठी हा गट नसेल. मात्र राष्ट्रीय विषयांना प्रकाशात आणण्यासाठी हा गट कार्यरत असेल. हा गट म्हणजे संघटना नसेल तर राष्ट्रीय चळवळ असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारच्या आर्थिक विदेशी धोरणांवर त्यांनी यावेळी टीका केली. देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना “राष्ट्र मंच’चे सर्वाधिक प्राधान्य असेल, असेही सिन्हा यांनी सांगितले.

आपल्याला आपली मते व्यक्‍त करण्यासाठी पक्षामध्ये कोणतेही स्थान उपलब्ध नसल्यामुळेच आपण या संघटनेत सामील झाल्याचे शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले. मात्र या मंचामध्ये सामील होणे म्हणजे पक्षविरोधी कृती समजली जाऊ नये. ही संघटनाही देशहितासाठीच स्थापन झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तृणमूल कॉंग्रेसचे दिनेश त्रिवेदी, कॉंग्रेसच्या रेणुका चौधरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मजिद मेमन, आम आदमी पार्टीचे संजय सिंह या खासदारांसह गुजरातचे माजी मुख्यमंत्री सुरेश मेहता आणि संयुक्‍त जनता दलाचे नेते पवन वर्मा हे या मंचच्या स्थापनेच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. राष्ट्रीय लोकदलाचे नेते जयंत चौधरी, माजी केंद्रीय मंत्री सोम पाल आणि हरमोहन धवन हे देखील या प्रसंगी उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)