यशवंतरावांच्या स्मारकाला महापालिकेचे पाच कोटी

पिंपरी – कै. यशवंतराव चव्हाण स्मारक समितीच्या वतीने निगडी, प्राधिकरणात कै. यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक बांधण्यात येणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका पाच कोटी रुपयांची आर्थिक मदत करणार आहे. याबाबतच्या ठरावाला बुधवारी (दि.16) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ऐनवेळी मान्यता दिली. यावर अंतिम निर्णय महासभा घेणार आहे.

कै. यशवंतराव चव्हाण स्मारक समिती ही मुंबई सार्वजनिक विश्‍वस्त व्यवस्था नोंदणीकृत संस्था आहे. या समितीच्या वतीने पिंपरी महापालिकेच्या हद्दीत निगडी, प्राधिकरण येथे कै. यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक बांधण्यात येणार आहे. त्यामध्ये गोर-गरिब, अनाथ व अपंगांसाठी अभ्यासिका, वसतीगृह, सांस्कृतिक भवन, ग्रंथालय व वाचनालय, व्यायामशाळा, आयुर्वेदिक उपचार केंद्र, कॉन्फरन्स हॉल बांधण्याचे नियोजन आहे. त्यासाठी पिंपरी महापालिकेतर्फे आर्थिक मदत करण्याची विनंती यशवंतराव स्मारक समितीने केली होती. त्यानुसार पालिका पाच कोटी रुपयांची मदत करणार असून त्याला स्थायी समितीने मंजुरी देऊन महासभेकडे शिफारस केली आहे.

यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रभर राबविलेल्या औद्योगिक धोरणांमुळेच पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्र मोठे उद्योगधंदे उभे राहिले. त्यामुळे अल्पावधीतच शहराची ओद्योगिकनगरी अशी ओळख देशभरात झाली. पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर नावारुपास आले. यशवंतरावांनी राबविलेल्या औद्योगिक आणि सहकार धोरणांमुळेच लाखो हातांना रोजगार मिळाला. उद्योगांना चालना मिळाली. व्यापा-यांना व्यापार मिळाला. त्यांचे हेच ऋण फेडण्याचे औचित्य मिळावे. त्यांच्या कार्याची प्रेरणा व स्फूर्ती भावी पिढीतील युवकांना मिळावी. यासाठी त्यांचे पालिका क्षेत्रात स्मारक असणे गरजेचे आहे. यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक शहरात उभे राहण्याकरिता समितीला पाच कोटी रुपयांची मदत केली जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)