“यशवंत’चा मुद्दा “जड’ जाणार

संग्रहित छायाचित्र....

कारखान्याचे 22 हजार शेतकरी सभासद निवडणुकीपूर्वी निर्धार मेळावा घेवून धोरण ठरविणार

थेऊर- यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात प्रशासकीय आणि शासकीय पातळीवर कुठलीच हालचाल दिसत नसताना पुन्हा एकदा 2019च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कारखान्याच्या नावावर मतं मागण्याच्या हालचाली इच्छुक उमेदवारांकडून सुरू झाल्या आहेत. शिरूर-हवेली मतदार संघात हवेलीची मतदार संख्या यावेळी वाढली आहे. यातील पूर्व हवेलीतील मते किमान 40 टक्के असून हे मतदार यशवंत कारखान्याचे सभासद आहेत. परंतु, यावेळी कुठल्याही आश्‍वासनाला फसायचे नाही तर लढायचे, असा निर्धार सभासदांनी केला असून निवडणुकीपूर्वी निर्धार मेळावा घेऊन धोरण ठरविण्यात येणार आहे. यामुळे यशवंत कारखान्याचा प्रश्‍न निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या राजकीय पक्षांना जड जाणार असल्याचे उघड आहे.
शिरूर, हवेली मतदार संघातील निवडणूक यशवंत कारखान्याभोवती फिरते. या तालुक्‍यातील अनेक दिग्गज मंडळी सहकार क्षेत्रातून राजकारणात आली आहेत. परंतु, गेली दोन टर्म कारखाना सुरू करू, एवढ्या एकाच आश्‍वासनावर खासदारकी आणि आमदारकी लढविली जात आहे. शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि भाजपचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी याच मुद्यावर निवडणूक जिंकली होती तर तत्पूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अशोक पवार यांनीही निवडणुकीत यशवंतचा मुद्दा लावून धरला होता. यासह राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, कॉंग्रेसचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील तर रासपचे महादेव जानकर, स्वाभिमानीचे राजु शेट्टी यासह अन्य छोट्या-मोठ्या पक्षांनीही यशवंतच्या मुद्यावर भाषणबाजी केली आहे.
शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर तर मतदारांनी दोन वेळा विश्‍वास टाकून पाहिला परंतु, सत्तेत असतानाही त्यांना यशवंत कारखान सुरू करता आलेला नाही. हिच ओरड भाजपचे आमदार बाबुराव पाचर्णे यांच्याही नावाने शेतकरी सभासद करू लागले आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाने यावे आणि यशवंतच्या सभासद शेतकऱ्यांना टपली मारून जावे, अशी गत झाली आहे. याच कारणातून आगामी निवडणुकांपूर्वी शेतकरी सभासंद निर्धार मेळावा घेवून मतदार, उमेदवार, राजकीय पक्ष आदी मुद्यावर चर्चा घडवून आणण्याच्या विचारात आहेत. वेळ प्रसंगी मतदान करताना नोटा (कोणत्याच उमेदवाराला मत द्यायचे नाही) पर्याय वापरण्यावरही या मेळाव्यात निर्णय होवू शकतो.

  • कारखान्याच्या सभा झाल्या पण निर्णय नाही…
    दरम्यान, यशवंत कारखाने अखरेचा गळित हंगाम 2010-11मध्ये उरकला होता; त्यानंतर आर्थिक अडचणीतून कारखाना बंद पडला. यातून मार्ग काढण्यासाठी तत्कालीन प्रशासक बाळासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दि. 18 सप्टेंबर 2012 मध्ये विशेष सर्वसाधारण सभा झाली होती. यावेळी कारखाना जमीन विक्रीचा मुद्दा मांडला गेल्याने ही सभा गोंधळात झाली होती. त्यानंतर पाच वर्षांनी म्हणजे दि. 21 एप्रिल 2017ला कारखान्याच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष पी. आर. घोडके यांनी विशेष सर्वसाधारण सभा घेत कारखाना दिर्घ मुदतीच्या कराराने भागीदारी अथवा सहयोगी तत्वावर खासगी किंवा सहकारी संस्थेस चालविण्यास देणे. भाडेतत्वावर चालविण्यास देणे. कारखान्याच्या अतिरिक्त जमिनीची विक्री करून निधी उपलब्ध करावा, असे तीन पर्याय ठेवले होते. परंतु, त्यानंतर कुठल्याच गोष्टीवर निर्णय झाला नाही. यानंतर कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा दि. 21 एप्रिल 2017 मध्ये झाली होती. परंतु, या सभेनंतर गेल्या एक वर्षात प्रशासक बी.जे.देशमुख कारखाना सुरू करण्याच्या कामकाजाबाबत कुठलेही प्रभावी काम करू शकलेले नाही.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)