जाणून घेऊया : ‘यवतेश्‍वर देवस्थाना’ बाबत

सातारा – श्रावणातल्या श्रद्धेचा रंग हिरव्यागार निसर्गाच्या साक्षीने अधिक गहिरा होतो तो यवतेश्वराच्या कुशीमध्ये. कासच्या निसर्गाला साद घालण्यासाठी जाताना यवतेश्वर गावातील प्रसिद्ध शंभू महादेवाच्या मंदिरात श्रद्धेने नतमस्तक व्हावे लागते. विस्तीर्ण सभामंडप दणकट काळ्या पाषाणातील चिरांचे बांधकाम, आकाश कडे निमुळता होत जाणारा हेमाडपंती शैलीचा कळस त्यामुळे यवतेश्वरच्या महादेवाचा संदर्भ थेट नवव्या शतकातील सातवाहन काळातील सांगितला जातो.

महाबळेश्वराच्या राजमार्गावरील निबिड जंगलातील मुख्य वाट सोडून शंभर मीटर आडवाटेला गेल्यानंतर यवतेश्वर मंदिराचे विस्तीर्ण प्रांगण दृष्टीस पडते. मंदिराच्या परिसरात काही द्रविड परिवार परंपरेने येथे राहतात. गाभाऱ्यात विस्तीर्ण पिंडीची शाळुंखी आणि गाभाऱ्यासमोर भव्य दगडी नंदी लक्ष वेधून घेतो. दरवाजावर संगमरवरी गणपती आणि डावीकडे द्वारपाल महाकालेश्वराचे मंदिर महादेवाच्या स्वागतासाठी सज्ज असतात. परळी तसेच बारा वाड्यातील यात्रांचा हंगाम यवतेश्वरला बेलार्पण करूनच होतो. नोव्हेंबर महिन्यात विशिष्ट आंब्याच्या झाडाला मोहोर येतो. तेव्हा यात्रेची तिथी निश्‍चित केली जाते. श्रावणमासानिमित्त लघु रुद्र, पहाटे रुद्राभिषेक आरती सायंकाळी प्रसाद वाटप असे धार्मिक कार्यक्रम होतात. साताऱ्यातील भाविक सात किलोमीटरचा घाट ओलांडून यवतेश्वर महादेवाच्या दर्शनाला जातात. यवतेश्वराच्या पिछाडीला विस्तीर्ण पुष्करिणी तलाव आहे. तो बाराही महिने भरलेला असतो. यवतेश्वराचा आशिर्वाद घ्या आणि निसर्गाशी एकरूप व्हा असेच येथील श्रावणसरींचे म्हणणे असते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)