यवत- दौंड तालुक्‍यातील यवत येथील मुस्लीम समाजसह आदी जाती धर्मातील तरुण एकत्र येत गेली 8 वर्षांपासून “ना भेद, ना भाव, सर्व धर्म समभाव’ या उक्तीप्रमाणे गणेशाची प्रतिष्ठापना मोठ्या भक्तीभावाने करीत आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण सापळे यांनी दिली.
सर्व जाती धर्मातील तरुणांनी 2011 साली एकत्र येत साईनाथ मित्र मंडळाची स्थापना केली. या तरुण मंडळात मुस्लीम तरुणांसह आदी समाजाचे साधारण 25 पेक्षा अधिक तरुण आहेत. या तरुणांनी जाती-पातीचा अडसर न मानता गणेशोत्सव काळात गणेशाची प्रतिष्ठापना करून मोठ्या भक्ती भावाने आणि मनोभावे हा गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गणेशाची प्रतिष्ठापना ते गणेश विसर्जनापर्यंत दहा ते अकरा दिवस हे सर्वच तरुण गणेशाच्या सेवेत तल्लीन होत असतात. या मंडळात मुस्लीम तरुणाची संख्या लक्षणीय आहे. यामध्ये लक्ष्मण सापळे, आशू शेख, समीर तांबोळी, अख्तर शेख, सागर पवार, जुबेर मुलाणी यांच्यासह आदी तरुण गणेशोत्सवात सहभागी होत आहेत. या तरुणांचे गणेशोत्सव साजरा करण्याचे हे 8 वे वर्षे आहे. या गणेशोत्सवा निमित्ताने या तरुणांनी ‘सर्व धर्म समभाव’ चा संदेश एकप्रकारे समाजाला देण्याचा प्रयत्न केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)