यवतला कालवा निरीक्षकाला मारहाण

जुना मुठा उजव्या कालव्यातून शेतकऱ्यांची पाणीचोरी

यवत- यवत (ता. दौंड) गावच्या हद्दीतून वाहत असलेल्या खैरेवस्ती येथील जुना मुठा उजवा कालव्याचे पाणी पाइपद्वारे शेतकरी शेतीसाठी चोरून वापरत असताना ते पाइप काढण्याचे काम करीत असताना कालवा निरीक्षक गोपीनाथ जालिंदर साळुंके (वय 40, रा. केडगाव, ता. दौंड) यांना सरकारी कामात अडथळा आणून शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केल्याप्रकरणी शेतकरी आबा बाळासाहेब दोरगे (रा. यवत, ता. दौंड) याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 25) दुपारी घडली.

या प्रकरणाची अधिक माहिती अशी की, सध्या उन्हाळी परिस्थिती असून नवीन मुठा उजवा कालव्याचे आवर्तन नसल्याने कालवा कोरडाठाक आहे. जुन्या बेबी कालव्याला पाणी सुरू आहे. आपल्या शेतातील पिके वाचविण्यासाठी शेतकरी बेबी कालव्यात पाइप टाकून पाणी चोरून घेत असल्याचे प्रकार सुरू आहे. गावाच्या हद्दीत असलेल्या खैरेवस्तीजवळील जुन्या मुठा उजव्या कालव्यात पाइप टाकून शेतकरी शेतीसाठी पाणी चोरून वापरत असताना कालवा निरीक्षक गोपीनाथ साळुंके हे पाइप काढण्याची कारवाई करीत होते. यावेळी आबा दोरगे तेथे आला आणि त्याने साळुंके यांना पाईप कोणास विचारून काढला, असे विचारून पाइप काढल्यास जिवे मारण्याची धमकी देत मारहाण केलीण
सरकारी कामात अडथळा आणत सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केली म्हणून साळुंके यांनी आबा दोरगे विरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी दोरगेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जितेंद्र पानसरे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)