यवतमाळमध्ये बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाला बेड्या!

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात भर मंडपात नवरदेवाला बेड्या ठोकण्याची घटना घडली आहे. नेर तालुक्‍यातील व्याहळी गावात ही घटना घडली. नेर पोलिसांनी आरोपी नवरदेवाला अटक केली असून सुनील जाधव असे टटक करण्यात आलेल्या नवरदेवाचे नाव आहे. कमी पैशात सोने देण्याच्या आमिष दाखवून त्याने अनेकांना गंडा घातल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
रेल्वे आणि बसमध्ये प्रवासादरम्यान सुनील जाधव आपली शिकार शोधत असे. परिचय वाढवून त्यांना कमी पैशांत सोने देण्याचे आमिष द्यायचा. त्यानंतर निर्जन ठिकाणी बोलावून संबंधित व्यक्तीकडून पैसे घेऊन दगडाची पिशवी द्यायचा. त्याचवेळी त्याचे तीन साथीदार पोलिसांच्या वेशात यायचे. पोलिस आल्याचे सांगत सुनील तिथून पळ काढून लोकांची फसवणूक करायचा.
सुनील जाधवने अशाप्रकारे आकोटमधील एका व्यक्तीला गंडा घातला होता. या प्रकरणात पोलिस त्याच्या शोधात होते. त्याच्या तीन सहकाऱ्यांच्या मुसक्‍या पोलिसांनी आवळल्या होत्या. तर सुनील मात्र पसार झाला होता. या दरम्यान व्याहाळी गावात सुनीलचे शुक्रवारी लग्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर बोहल्यावर चढण्यापूर्वी पोलिस तिथे दाखल झाले आणि त्याला बेड्या ठोकल्या. ज्या मुलीशी सुनीलचे लग्न होणार होते, तिनेही चोरासोबत लग्न करण्यास नकार देत लग्न मोडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)