यमुनेचे पाणी आणि वसुदेव प्याला

– अनिता यादव

गोकुळ अष्टमी हा सर्वांचाच अत्यंत आवडता सण. मुळात कृष्ण कन्हैया हा आमचा आवडता देव. अगदी जन्माला आल्यापासून चमत्कार करून दाखवणारा देव म्हणून तो मला खूप आवडायचा. त्याच्या जन्मापूर्वीच झालेली आकाशवाणी, देवकीचा आठवा पुत्र तुला ठार मारील म्हणून कंसाला दिलेला इशारा. कंसाने देवकीला, आपल्या बहिणीला तुरुंगात ठेवणे, तिची मुले मारणे, कंसाच्या तुरुंगात झालेला कृष्णाचा जन्म, त्यापूर्वी कंसाने मारलेली त्याची भावंडे, कृष्णाचा जन्म होताच तुरुंगावरील सर्व पहारेऱ्यांचे गाढ झोपी जाणे, तुरुंगाचे दरवाजे आपोआप उघडणे आणि एका टोपलीत घालून वसुदेवाने नुकत्याच जन्मलेल्या बालकृष्णाला गोकुळात नेणे सारेच अद्भुतरम्य. मी अगदी पहिल्यांदा कृष्णाची कथा ऐकली ती एका कीर्तनात. आमच्या घरासमोरच्या मंदिरातच एका कीर्तनात कृष्णजन्माची कथा सांगितली होती. तेव्हा कीर्तनकार बाईंनी कृष्णजन्माचे वर्णन करताना आमच्या डोळ्यासमोर सारे चित्रच उभे केले होते. वसुदेव एका टोपलीत ठेवलेल्या कृष्णाला घेऊन वसुदेव यमुना नदी पार करत असतो. यमुनेला प्रचंड पूर आलेला. मुसळधार पाऊस पडत असतो, कडकडाट करत विजा चमकत असतात. नदीचे पाणी वाढत असते. कृष्णाला गोकुळात नेणाऱ्या वसुदेवाच्या डोक्‍यापर्यंत पाणी येते. तो डोक्‍यावरची टोपली आणखी उंच करतो. शेवटी चम्त्कार होतो. टोपलीतील बाळकृष्णाचा पाय यमुनेच्या पाण्याला लागतो आणि यमुनेला आलेला पूर क्षणार्धात ओसरून जातो. वसुदेव बाळकृष्णासह सुखरूप गोकुळात येतो….हे सारे त्या कीर्तनात ऐकत असताना अगदी तल्लीन झाले होते सगळे.

ते कीर्तन ऐकल्यापासून मला अगदी लहानपणापासून कृष्ण आवडायला लागला होता. माझ्या लहान भावाचे नाव गणेश होते, पण मी त्याला कान्हाच म्हणायची, मी आईला कितीतरी वेळा सांगितले, की गणेशचे नाव श्रीकृष्ण, कान्हा किंवा गोविंदा का नाही ठेवलेस? त्याचे नाव आपण आता बदलले तर काय होईल? माझे हे बोलणे ऐकून आई फक्त हसायची. काही बोलायची नाही. लहानपणी आम्ही खेळताना माझ्या भावाला कृष्ण बनवून मध्ये उभा करून ठेवायचो आणि त्याच्याभोवती फेर धरून नाचायचो. एका पायावर दुसरा पाय टेकवून तो कृष्णासारखा उभा राहायचा. आणि बासरी म्हणून कसलीही काठी हातात धरायचा. एकदा तर त्याने चुलीपुढची फुंकणीच बासरी म्हणून आणली होती. तेव्हा त्याला सगळे खूप हसले होते.

बालपणीची माझी कृष्णाची आवड समजायला लागल्यारही कायम राहिली. नुसती कायम राहिली नाही, तर वाढत गेली. मात्र नंतर भगवान श्रीकृष्ण आवड्‌ण्याची कारणे बदलत गेली. श्रीकृष्णच. नितीश भारद्वाजने केलेला कृष्ण पाहून खरा कृष्ण त्याच्यापेक्षा वेगळा असूच शकणार नाही अशीच आमची खात्री झाली होती.
शाळेत असताना वक्रनलीकेच्या तत्त्वावरील वसुदेव प्याला सरांनी दाखवला होता. पेल्यात पाणी ओतत राहायचे, पेल्यातील वसुदेवाच्या डोक्‍यावच्या टोपलीत असलेल्या बाळकृष्णाच्या पायापर्यंत पाणी येताच संपूर्ण पेला रिकामा होत असे, त्यामागचे तत्त्व समजल्याचे नवल वाटायचे कमी झाले.
पण भगवान कृष्णाच्या स्पर्शाने यमुनेचे पाणी कसे ओसरले याचे मात्र नवल आजही वाटते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)