यजमान इंग्लंडसमोर आज दक्षिण आफ्रिकेचे आव्हान

पहिली उपान्त्य लढत आज रंगणार
महिला विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा

ब्रिस्टॉल – साखळी फेरीत इंग्लंडच्या महिला संघाने दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाला पराभूत केले होते. परंतु महिला विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेतीलआज (मंगळवार) रंगणाऱ्या पहिल्या उपान्त्य लढतीत पुन्हा याच दोन संघांची गाठ पडेल, तेव्हा या निकालाचा फारसा अर्थ फउरणार नसल्याचे मत इंग्लंडची सलामीवीर टॅमी ब्यूमॉंटने व्यक्‍त केले आहे. तिच्या या विधानातूनच या उपान्त्य लढतीतील चुरस स्पष्ट होत आहे.

या सामन्यातील दोन्ही प्रतिस्पर्धी संघांच्या स्पर्धेतील आतापर्यंतच्या कामगिरीकडे एक नजर टाकणे योग्य ठरेल. इंग्लंडला सलामीच्याच सामन्यात भारतीय महिलांकडून अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु त्यानंतर सलग सहा सामने जिंकताना इंग्लंडच्या महिलांनी दिमाखात उपान्त्य फेरीतील स्थान सर्वप्रथम निश्‍चित केले. त्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने सातपैकी चार सामने जिंकताना दोन गमावले, तर एक सामना पावसामुळे रद्द करावा लागला.

दक्षिण आफ्रिकेच्या महिला खेळाडू साखळी फेरीतील पराभवाची परतफेड करण्यासाठी उत्सुक असणार. त्यामुळेच त्यांना पुन्हा पराभूत करणे सोपे जाणार नाही, असे सांगून टॅमी ब्यूमॉंट म्हणाली की, आम्ही भारतीय महिलांविरुद्ध पहिल्याच सामन्यातील पराभव मागे टाकून जबरदस्त कामगिरी करताना पुढचे सर्व सामने जिंकले. परंतु आमच्या कामगिरीत अद्यापही अनेक कच्चे दुवे असून सुधारणा करण्यासही बराच वाव असल्याचे आमच्या प्रशिक्षकांचे मत आहे. आमच्यासाठी ही चांगलीच बाब आहे, कारण आम्ही नेहमीच काहीतरी नवीन शिकण्यासाठी आणि प्रगती करण्यास उत्सुक असतो.

टॅमी ब्यूमॉंट ही विश्‍वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी फलंदाज असली, तरी तिच्यासह इंग्लंडच्या सर्वच फलंदाजांची दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाची कर्णधार व स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज डेन व्हॅन निकर्कविरुद्ध उद्या कसोटी लागणार आहे. ब्यूमॉंटने सात सामन्यांत 372 धावा फटकावल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाविरुद्ध एकट्यादुकट्या खेळाडूच्या कामगिरीमुळे जिंकता येणार नाही, असे सांगून ब्यूमॉंट म्हणाली की, त्यांचा संघ खरोखरीच दर्जेदार आहे. त्यामुळे आम्हाला सर्वोत्तम सांघिक कामगिरी करण्याची गरज भासणार आहे.
दक्षिण आफ्रिकेची कर्णधार डेन व्हॅन निकर्कने सहा सामन्यात 15 बळी घेतले आहेत. इंग्लंडविरुद्ध उपान्त्य लढतीसाठी आम्ही उत्सुक आहोत, असे सांगून ती म्हणाली की, विश्‍वचषक स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत पोहोचल्यामुळे आम्ही आनंदित आणि रोमांचित झालो आहोत. आम्ही 2000 नंतर पहिल्यांदाच उपान्त्य फेरी गाठली असून ही संधी न गमावण्याचा आम्ही निर्धार केला आहे. माझ्या सर्वच सहकारी खेळाडूंच्या कामगिरीचा मला अभिमान वाटतो. उद्याच्या उपान्त्य लढतीत आमच्यावर कसलेही दडपण नाही.

प्रतिस्पर्धी संघ-
इंग्लंड महिला संघ- हीथर नाईट (कर्णधार), जॉर्जिया एल्विस, जेनी गन, अलेक्‍स हार्टली, सारा टेलर, टॅमी ब्यूमॉंट, कॅथेरिन ब्रन्ट, डॅनिएली हॅझेल, बेथ लॅंगस्टन, लॉरा मार्श, ऍन्या श्रबसोल, नताली स्किव्हर, फ्रॅन विल्सन, डॅनिएली व्याट व लॉरेन विनफील्ड.

दक्षिण आफ्रिका महिला संघ- डेन व्हॅन निकर्क (कर्णधार), त्रिशा चेट्टी, मोझेलिन डॅनियल्स, नेडिन डी क्‍लार्क, मिग्नॉन डु प्रीझ, शबनम इस्माईल, आयाबोंगा खाका, मेरिझेन कॅप, मासाबाता क्‍लास, लिझेल ली, सुने लुस, रायसिबे एन्तोझाखे, अँड्री स्टेन, च्लो ट्रायॉन, लॉरा वूल्व्हार्ट व ओडिन कर्स्टन.
सामन्याचे ठिकाण- ब्रिस्टॉल. सामन्याची वेळ- दुपारी 3-00 पासून.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)