यंदा साखरेचे 30% अधिक उत्पादन…

सुभाष देशमुख : इथेनॉलला चांगला भाव देण्याचे शासनाच्या विचाराधीन
पुणे – यंदा गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. तसेच, उसाच्या उत्पादनात मोठ्याप्रमाणात वाढ झाल्यामुळे पुढील हंगामातही साखरेच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्‍यता आहे. या सर्व बाबींचा विचार करून यावर्षी एक ऑक्‍टोबरपासूनच गाळप हंगाम सुरू करण्याचा विचार आहे. हंगाम लवकर सुरू करून कच्ची साखर निर्यात करता येईल आणि उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करून चांगला भाव देता येईल का याबाबतही राज्य शासन विचार करत असल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी सारखरेचे उत्पादन 30 टक्के जास्त झाले आहे. त्यामुळे शेतकरी आणि कारखान्यांचा अंदाज चुकला असून, मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाल्यामुळे भावावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ही साखर परदेशात विकण्याचा विचार शासन करत असल्याचे देशमुख यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, केंद्र सरकारने 2017-18 साठी 3500 ते 3600 रुपये एफआरपी दर दिला होता. तर राज्यात 2600 ते 2700 रुपये भाव आहे. यामुळे कारखानदारांना शेतकऱ्यांना एफआरपी देण्यास अडचणी येत आहे. साखरेचे देशांतर्गत दर आणि देशाबाहेरील दर यांची तुलना करता राज्य सरकार अनुदान देण्याचा विचार करत आहे. तसेच चॉकलेट, मिठाई व इतर व्यवसायांमध्ये वापरल्या जाणाऱ्या साखरेस जास्त दर आणि ग्राहकांसाठी कमी दर असावा, असा प्रयत्न सुरू आहे. मात्र, हा अधिकार केंद्र सरकारचा असल्याचे देशमुख यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, 2008 मध्ये वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच इमुपालन, शेडनेटसाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचाही यामध्ये समावेश करण्यात येणार आहे. यामध्ये अंदाजे साडेतीन लाख शेतकऱ्यांचा समावेश होणार असून, कर्जमाफीची रक्कम 3 हजार 100 कोटी रुपये इतकी असणार आहे. तूर खरेदीच्या प्रश्‍नाबाबत देशमुख म्हणाले, 18 एप्रिलपर्यंत तूर खरेदी सुरू होती. त्यानंतर पंधरा दिवसांची मुदत वाढवून दिली असून, तुरीची डाळ करून विकण्यात येणार आहे. तूरडाळ घेण्याची विनंती तामिळनाडू सरकारला करण्यात आली आहे. मॉल व विविध देवस्थानांनाही तूरडाळ विकण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)